Lalit drug racket case : ललितच्या पलायनाला महिना; ससूनमधील दोषी मोकाटच | पुढारी

Lalit drug racket case : ललितच्या पलायनाला महिना; ससूनमधील दोषी मोकाटच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रग्ज तस्कर प्रकरणातील आरोपी ललित पाटील ससून रुग्णालयातून 2 ऑक्टोबर रोजी पळून गेला. त्यानंतर कारागृह आणि ससून प्रशासनाच्या कामकाजाचे वाभाडे निघाले. या प्रकरणाशी संबंधित पोलिसांचे निलंबन झाले. मात्र, हे प्रकरण घडून आज एक महिना उलटल्यानंतरही ससूनमध्ये कोणावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे ससून प्रशासनावर जोरदार टीका होत आहे.

दोन-तीन महिन्यांपूर्वी ससूनमध्ये एका कर्मचार्‍याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्याच दिवशी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी तातडीने वैद्यकीय अधीक्षकांचा कार्यभार काढून घेण्याची तत्परता दाखवली होती. मग, कैदी पळून गेल्याचा भीषण प्रकार घडलेला असताना कारवाईची तत्परता का दाखवली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ललित पाटील प्रकरणात खुद्द डीनवरच संशयाची टांगती तलवार आहे. ललित पाटीलला उपचारांसाठी ससूनमध्ये ठेवण्याची शिफारस डॉ. ठाकूर यांनीच केल्याचे आणि तसे पत्र कारागृह अधीक्षक आणि उपअधीक्षक यांना पाठवल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांच्याभोवती संशयाचे वलय निर्माण झालेले असताना त्यांच्यावर कारवाई करणार कोण, अर्थात ‘मांजरांच्या गळ्यात घंटा बांधणार कोण’ अशी चर्चा ससूनमधील डॉक्टरांमध्ये असल्याचे समजते. ललित पाटील प्रकरणातील पोलिसांचे निलंबन झाले; मात्र कोणालाही अटक किंवा गुन्हा दाखल झाला नाही.

या प्रकरणात ससूनमधील डॉक्टर किंवा वरिष्ठ दोषी आढळल्यास निलंबन किंवा बदलीचा फार्स केला जाणार की रीतसर गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवली जाणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पुणे पोलिसांनी मंगळवारी मुंबई पोलिसांकडून ललित पाटीलचा ताबा घेतला. त्याच दिवशी त्याची ससूनमध्ये एका तासात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी ससूनमध्ये आपल्याला पैशांसाठी मारहाण झाल्याचा खुलासा ललित पाटीलने वकिलांकडून केला. त्याने यापूर्वीही ‘मला ससूनमधून पळवून लावण्यात आले’, असे विधान केले होते. आता पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळाल्यावर तो ससूनमधील डॉक्टरांबाबत काही गौप्यस्फोट करेल का, या विचाराने दोषींची झोप उडाल्याचे बोलले जात आहे.

कठोर कारवाई होणार का?

चौकशी समितीने राज्य शासनाला सादर केलेला अहवाल अद्याप गोपनीय ठेवला आहे. त्यामुळे अहवालात कठोर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे, की केवळ दिखाव्यापुरती कारवाई केली जाणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. शासनाकडून डॉ. ठाकूर यांचे निलंबन केले जाणार की बदली केली जाणार, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

पंधराव्या शतकातील कृत्रिम हाताचा शोध

Dattu Bhokanal : नौकानयन स्पर्धेत दत्तू भोकनळची रौप्यकमाई

Pimpri News : पीएमआरडीएचा रिंगरस्ता रडतखडत

Back to top button