Dattu Bhokanal : नौकानयन स्पर्धेत दत्तू भोकनळची रौप्यकमाई | पुढारी

Dattu Bhokanal : नौकानयन स्पर्धेत दत्तू भोकनळची रौप्यकमाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गोवा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नौकानयन स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी करत चार पदकांची कमाई केली. त्यात नाशिक जिल्ह्यातील दत्तू भोकनळने (Dattu Bhokanal)  रौप्यपदक जिंकले. याशिवाय पुरुषांच्या कॉक्सलेस फोर प्रकारात रौप्य तसेच क्वाड्रापूल आणि डबल स्कल गटांमध्ये कांस्यपदक पटकावले. नौकानयनमध्ये महाराष्ट्राने दोन रौप्य, दोन कांस्य अशी एकूण चार पदकांची कमाई केली आहे.

पुरुष वैयक्तिक स्कल गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू भोकनळला (Dattu Bhokanal)  तीन सेकंदांच्या फरकाने सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. त्याने सहा मिनिटे, ३१.९ सेकंद अशी वेळ नोंदवली. या गटात सेनादलच्या बलराज पनवारने सुवर्णपदक (सहा मिनिटे, २८.५ सेकंद) आणि पंजाबच्या करमजित सिंगने (सहा मिनिटे, २८.५ सेकंद) कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या कॉक्सलेस फोर गटात महाराष्ट्राने रुपेरी यश मिळवले. अक्षत, गुरमित सिंग, विपुल घुर्डे आणि जसमेल सिंग यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने पाच मिनिटे, ५२.१ सेकंद अशी वेळ नोंदवली. सेना दलाने (पाच मिनिटे, ४७.५ सेकंद) सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या संघात जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनीत कुमार आणि आशिष यांचा समावेश होता. लखवीर सिंग, जसप्रीत सिंग, हरपाल सिंग आणि परविंदर सिंग यांचा समावेश असलेल्या झारखंडच्या संघाने कांस्यपदक मिळवले.

पुरुषांच्या क्वाड्रापूल गटात तेजस शिंदे, ओमकार म्हस्के, मितेश गिल, अजय त्यागी या चौकडीने पाच मिनिटे, ३४.७ सेकंदांसह तृतीय क्रमांक मिळवला. सेनादलच्या सतनाम सिंग, परमिंदर सिंग, जाकर खान, सुखमित सिंग या संघाने सुवर्णपदक जिंकताना पाच मिनिटे, २९.१ सेकंद अशी वेळ राखली. तर दिल्लीच्या संघाने (पाच मिनिटे, ३१.१ सेकंद) सुवर्णपदक पटकावले. या संघात सुनील अत्री, उज्ज्वल कुमार सिंग, मनीष, रोहित यांचा समावेश होता.

पुरुषांच्या डबल स्कल गटात मितेश गिल आणि अजय त्यागी जोडीने सहा मिनिटे, २९.० सेकंद अशी वेळ नोंदवत कांस्यपदक प्राप्त केले. सेनादलच्या सतनाम सिंग आणि परमिंदर सिंग (सहा मिनिटे, १३.१ सेकंद) जोडीने सुवर्णपदक आणि दिल्लीच्या मनजित कुमार आणि रवि जोडीने (सहा मिनिटे, २१.३ सेकंद) कांस्यपदक पटकावले.

सरावातील सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळाले. सिंगल स्कल क्रीडाप्रकारात हे पहिलेच पदक असल्याने नौकानयनमधील सर्वच प्रकारात पदक मिळाल्याचा आनंद वेगळाच आहे. या स्पर्धेने पुन्हा एकदा कमबॅक करता आले.

– दत्तू भोकनळ, आंतरराष्ट्रीय खेळाडू, नौकानयन

नौकानयनच्या सात स्पर्धा प्रकारांत महाराष्ट्राचे क्रीडापटू सहभागी झालेत. यापैकी चार पदके पटकावली. मागील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या कामगिरीची तुलना केल्यास ही प्रशंसनीय नक्कीच आहे.

– राजेंद्र शेळके, महाराष्ट्राचे प्रशिक्षक

हेही वाचा :

Back to top button