Pune News : पतीसह सासरच्यांवर आरोप करणार्‍या पत्नीला दणका | पुढारी

Pune News : पतीसह सासरच्यांवर आरोप करणार्‍या पत्नीला दणका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पतीसह सासरच्यांवर गंभीर आरोप करणार्‍या पत्नीला कौटुंबिक न्यायालयाने दणका देत पतीच्या घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा दावा दाखल करीत घटस्फोटाच्या दाव्यात अचानक बदनामीकारक आणि घाणेरडे आरोप केले. ते आरोप सिध्द न करता आल्याने क्रूरतेनुसार न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. याखेरीज पत्नीने 5 लाख रुपयांची केलेली नुकसानभरपाईची मागणीही न्यायालयाने फेटाळली.

वैभव आणि वैभवी (नावे बदलली आहेत) दोघांचा विवाह जून 1997 मध्ये झाला. तो नोकरी करतो, तर ती व्यावसायिक आहे. काही वर्षे दोघांनी सुरळीत संसार केला. दोघांना एक मुलगा आहे. दरम्यान, तिचे शेजारी राहणार्‍या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध सुरू झाले. ही बाब निदर्शनास येताच पतीने तिला समज दिली. तिच्या स्वभावात फरक पडेल, अशी त्याला आशा होती.

मात्र, तिच्या वर्तणुकीत फरक पडलाच नाही. कोणत्याही कारणाशिवाय ती मुलाला घेऊन 2004 मध्ये माहेरी गेली. या दाव्यात पतीतर्फे अ‍ॅड. के. टी. आरू-पाटील, अ‍ॅड. केदार केवले, अ‍ॅड. संभाजी पांचाळ, अ‍ॅड. प्रज्ञा गुरसळ आणि अ‍ॅड. दिव्यश्री कुंभार यांनी काम पाहिले. पतीने मध्यस्थांमार्फत नांदण्यास येण्यास प्रयत्न केले. मात्र, तिने नांदण्यास नकार दिला.

2015 मध्ये पती आणि कुटुंबीयांवर कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा दाखल केला. त्यामध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचे म्हटले होते. मात्र, घटस्फोटाच्या दाव्यात पती आणि कुटुंबीयांवर अचानकपणे घाणेरडे आरोप केले. पतीचे अनेक स्त्रियांबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत. तो दारूच्या आहारी गेलेला आहे. अश्लील पुस्तके वाचून पत्नीशी त्याप्रमाणे वागत असे. पतीचा भाऊ गुंड प्रवृत्तीचा आहे. कुटुंबीयांनी तिला मारहाण केल्याचे आरोप केले. मात्र, हे आरोप ती सिध्द करू शकली नाही. त्यामुळे न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला.

हेही वाचा

NCP Dispute: राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आयोगाकडे आणली ट्रकभर कागदपत्रे

Opposition Iphone: सरकार पाळत ठेवत असल्याचा विरोधकांचा नवा हल्लाबोल

Pune News : गुटख्याच्या पिचकारीत तरुणाई बुडाली

Back to top button