Pune News : गुटख्याच्या पिचकारीत तरुणाई बुडाली | पुढारी

Pune News : गुटख्याच्या पिचकारीत तरुणाई बुडाली

कुसेगाव : पुढारी वृत्तसेवा : गावोगावी टपर्‍या आणि किराणा दुकानात गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने तरुणवर्ग व्यसनाधीन होत चाललेला आहे. तरुणांची ही व्यसनाधीनता रोखण्यासाठी गुटखा ठेकेदारांना पोलिसांनी आळा घालावा, अशी मागणी दौंड तालुक्यातून होऊ लागली आहे. दौंड तालुक्यातील यवत पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या पाटस व वरवंड गावच्या बाजारपेठा मोठ्या असल्याने तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात येथे येतो. मात्र, या गावात गुटखा विक्री करणार्‍यांची संख्या जास्त असल्याने त्यांना सहज गुटखा उपलब्ध केला जात आहे. परिणामी, तरुणाई गुटख्याच्या पिचकार्‍या मारण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.

दौंड तालुक्यातील यवत पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या पाटस आणि वरवंड गावांत शैक्षणिक विकास झाल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या गावात शिक्षणासाठी येतात. मात्र, या गावात खुलेआम गुटखा मिळत आहे. तरुण आणि विद्यार्थीवर्ग यात अडकत चालल्याने पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पोलिसांवर दबाव की गुटखा विक्रेत्यांची दहशत?
पाटस गावची लोकसंख्या ही जास्त असल्याने बाजारपेठ मोठी आहे. यामुळे गावात उद्योग-धंदे जास्त असल्याने सर्वाधिक पानटपर्‍या या गावात आहेत. त्यांना सहज गुटखा उपलब्ध करून पुरवला जात आहे, तर खुलेआम दिवसाढवळ्या पद्धतीने गुटखा पुरवणारे वरवंड व पाटस परिसरातीलच रहिवासी आहेत. त्यांच्या दहशतीमुळे कारवाई होत नसेल का ? की त्यांना यवत पाटस पोलिसांची भीती राहिली नाही हा प्रश्न ही नागरिकांना पडला आहे.

Back to top button