Pune News : रुग्णांची भिस्त कमला नेहरू रुग्णालयावर ; अन्य रुग्णालयात सुविधांची वानवा | पुढारी

Pune News : रुग्णांची भिस्त कमला नेहरू रुग्णालयावर ; अन्य रुग्णालयात सुविधांची वानवा

पुणे : शहरातील 50 लाख लोकसंख्येमागे महापालिकेचे केवळ कमला नेहरू रुग्णालय आरोग्यसेवा पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, मनुष्यबळासह अनेक सुविधांची वानवा असल्याने अनेकदा रुग्णांना ससून रुग्णालयात पाठविले जाते. वारजे आणि बाणेर येथील रुग्णालयांमध्ये सध्या ओपीडी सुरू करण्यात आली आहे. कमला नेहरू रुग्णालयात अनेक सुविधांचे खासगीकरण झाले आहे. त्यामुळे रुग्ण मोफत उपचारांपासून वंचित राहत आहेत. अनेक गरीब आणि गरजू रुग्णांना आरोग्यसेवा पुरविता येत नसल्याने अनेकदा गंभीर रुग्ण ससून रुग्णालयात पाठविले जातात. ससून रुग्णालयात पुणे जिल्ह्यांसह नाशिक, अहमदनगर, सोलापूर या भागांमधूनही रुग्ण येत असल्याने ससूनवर रुग्णसेवेचा प्रचंड ताण निर्माण होतो. ससूनला पाठविल्या जाणार्‍या रुग्णांचे प्रमाण कमी व्हावे आणि कमला नेहरू रुग्णालयावरील ताण हलका व्हावा, यासाठी महापालिकेने शहराच्या विविध भागांमध्ये ’मिनी ससून’ रुग्णालये उभारण्याची गरज गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्त होत आहे.

त्यानुसार बाणेर येथील नवीन रुग्णालय आणि वारजेमधील बराटे रुग्णालयाचा विकास सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात या दोन रुग्णालयांमधील सेवा अद्याप निविदांच्या चक्रात अडकल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना लाभ मिळण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. वारजेमधील बराटे रुग्णालयाची क्षमता 55-60 खाटांची आहे. येथे मेडिसीन, सर्जरी, कार्डिओलॉजी इत्यादी विभाग सुरू करण्यात येत आहेत. सध्या केवळ ओपीडी सुरू असून, आंतररुग्ण विभाग सुरू करण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. बाणेर नवीन रुग्णालयातही सध्या ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

कोरोना काळात सुरू करण्यात आलेल्या जुन्या बाणेर रुग्णालयात नायडू रुग्णालय स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. नवीन बाणेर रुग्णालयात सध्या बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला असून, दोन-तीन महिन्यांमध्ये आंतररुग्ण विभाग सुरू करण्यात येईल. सीजीएचएस दरांपेक्षा 5 टक्के कमी दराने रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविल्या जाणार आहेत. मनुष्यबळाची वानवा असल्याने रुग्णालय सुरू करण्यास विलंब होत आहे.

– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

हेही वाचा

विमानाच्या मागे दिसणारी पांढरी रेषा म्हणजे धूर नव्हे

Manish Sisodia : मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

Pune University : अधिसभेमध्ये विद्यापीठ कर्मचार्‍यांचा राडा

Back to top button