व्यक्‍तिचित्र : बाणेदार मेलोनी | पुढारी

व्यक्‍तिचित्र : बाणेदार मेलोनी

सुचित्रा दिवाकर

इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे भारतातील जी-20 परिषदेदरम्यानचे भाषण चांगलेच लोकप्रिय झाले होते. स्वतःला मुसोलिनीच्या वंशज असल्याचे सांगणार्‍या मेलोनींनी मागील काळात ‘पुतीन यांना भेटायला माझ्याकडे वेळ नाही,’ असे विधान करून खळबळ उडवून दिली होती. जोडीदाराने महिलांविषयक केलेल्या टिप्पणीवरून त्याच्याशी असणारे नातेसंबंध तोडून टाकत त्यांनी आपल्यातील बाणेदारपणा दाखवून दिला आहे.

गेल्या महिन्यात राजधानी दिल्ली येथे पार पडलेल्या जी-20 शिखर संमेलनामध्ये जगभरातून आलेल्या विविध राष्ट्रांच्या अध्यक्षांपैकी काही नेत्यांनी आपली एक वेगळीच छाप उमटवली होती. यामध्ये सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची झाली. सोशल मीडियावर जॉर्जिया यांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत हस्तांदोलन करताना दिसल्या. मोदींचं कौतुक करतानाचा एक व्हिडीओ सर्वाधिक शेअर झाला. ‘आमचं सरकार भारतासोबतचे संबंध द़ृढ करेल. आम्ही सोबत येऊन बर्‍याच गोष्टी करू शकतो याबद्दल मला विश्वास वाटतो. मोदी जगातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहेत. मी त्यांची बरोबरी करू शकत नाही.’ असं मेलोनी त्या व्हिडीओत म्हणताना दिसल्या. देखण्या पंतप्रधान म्हणवल्या जाणार्‍या मेलोनींची लोकप्रियतादेखील अफाट आहे.

इटलीच्या पंतप्रधान असलेल्या मेलोनी अतिशय कमी वयात राजकारणात सक्रिय झाल्या. त्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. ब्रदर्स ऑफ इटली पक्षाच्या नेत्या असलेल्या मेलोनी यांनी गतवर्षी निवडणूक जिंकून इतिहास रचला. एलजीबीटी, मुस्लिम विरोधक असल्याचे आरोप मेलोनी यांच्यावर होत असतात. फॅसिस्ट विचारसरणीच्या राज्यकर्त्या असल्याचे आरोपही त्यांच्यावर होतात. मात्र त्या या आरोपांकडे फारशा गांभीर्याने पाहत नाहीत. त्यांचे विचार, विधानं सातत्यानं चर्चेत असतात. मध्यंतरीचे ‘पुतीन यांना भेटायला माझ्याकडे वेळ नाही,’ हे विधान जगभरात गाजले होते. सत्तेतील त्यांच्या मित्रपक्षांचे रशियाशी गहिरे संबंध असूनही रशिया-युक्रेन युद्धात त्या युक्रेनची बाजू उचलून धरताना दिसतात. त्या स्वत:चा उल्लेख ‘मुसलोनीच्या वारसदारब’ म्हणूनही करतात.

सध्या मेलोनी यांची चर्चा एका वेगळ्या आणि वैयक्तिक कारणामुळे होत आहे. अलीकडेच मेलोनी यांनी त्यांचा प्रियकर आंद्रिया जियाम्ब्रुनोसोबतचे नाते संपुष्टात आणल्याची घोषणा केली आहे. तिचा बॉयफ्रेंड जियाम्ब्रुनो हा पत्रकार असून, तो काही काळापासून आपल्या महिलाविरोधी वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांच्या कुटुंबाद्वारे चालवल्या जाणार्‍या एमएफई मीडिया ग्रुपसाठी तो काम करतो. मध्यंतरी, त्याने आपल्या एका महिला सहकार्‍याला ‘ग्रुप सेक्स’साठी विचारणाही केली होती. ‘ग्रुप सेक्स’मध्ये भाग घेतला तरच ती आपल्यासोबत काम करू शकते, असे म्हटले होते. हा सरळसरळ कामाच्या ठिकाणी होणार्‍या लैंगिक शोषणाचा प्रकार होता.

जियाम्ब्रुनो पंतप्रधान मेलोनींसोबत गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. दोघांनाही जिनेव्रा नावाची एक 7 वर्षांची मुलगी आहे. त्याने यापूर्वीही अनेक वेळा महिलांबद्दल अशोभनीय आणि आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. जास्त दारूचे सेवन न केल्यास महिला गँगरेपपासून स्वतःचा बचाव करू शकतात, असे विधान त्याने केले होते. जियाम्ब्रुनो म्हणाला होता, तुम्ही नाचायला गेलात तर तुम्हाला नशेत राहण्याचा पूर्ण अधिकार आहे; परंतु तुम्ही नशेत असतानाही स्वतःला विसरू नका; अन्यथा तुम्ही लांडग्यांच्या तावडीत पडण्याचा धोका असेल.

पंतप्रधान म्हणून एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या जॉर्जिया यांना पत्रकारांनी ताज्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता, पार्टनरच्या कमेंटसाठी आपण जबाबदार नाही, त्यामुळे याबाबत कोणतेही प्रश्न विचारू नयेत, असे उत्तर दिले होते. तथापि, त्यानंतर मेलोनी यांनी स्वत:च्या ‘एक्स’ अकाऊंटवरून आपल्या जोडीदाराशी नाते संपुष्टात आणले असल्याची घोषणा केली. जियाम्ब्रुनोसोबत घालवलेल्या चांगल्या वेळेबद्दल मी कृतज्ञ आहे. त्याने मला आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट दिली, ती म्हणजे माझी मुलगी.

साहजिकच, या घटनेची सर्वदूर चर्चा होत आहे. 2014 मध्ये एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान त्यांची जियाम्ब्रुनोसोबत भेट झाली होती. यानंतर हे दोघे जवळ आले. या दोघांचे लग्न झाले नव्हते; पण ते एकत्र राहत होते. आता विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यातील नाते संपुष्टात आले आहे. मेलोनी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यावर हल्ला करून कमजोर करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना या निर्णयातून चपराक दिल्याचे मानले जात आहे. पंतप्रधानपदी राहणार्‍या एका महिलेने जोडीदाराच्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून वेगळे होण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी.

याच वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी आपली पत्नी सोफी जॉर्जपासून काडीमोड घेण्याचा निर्णय जाहीर करत 18 वर्षांपासून असणार्‍या वैवाहिक नात्याला पूर्णविराम दिला होता. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरस जॉन्सन यांनी 2018 मध्ये मरीना व्हिलर या आपल्या दुसर्‍या पत्नीपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. थेरेसा मे यांच्या नेतृत्वाखालील कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रिपदी असताना जॉन्सन यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता आणि 2020 मध्ये तो पूर्णत्वास गेला. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांनी 1996 मध्ये सिगानेर आल्बनेझ यांच्याशी दुसरा विवाह केला होता. परंतु 2007 मध्ये त्यांनी या नात्यातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. 2013 मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ल्यूडिमिया श्केरेबेनेव्हापासून विभक्ती जाहीर केली आणि पुढील वर्षी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. स्वीडनचे माजी पंतप्रधान फ्रेडरिक रेनफेल्ड यांनीही आपली पत्नी फिलिपा हिच्याशी 20 वर्षांपासून असणारे नाते संपुष्टात आणत 2012 मध्ये घटस्फोट घेतला. या सत्तापदावरील व्यक्तींबरोबरच रुपर्ट मर्ढोक, बिल गेटस् यांच्यासारख्या जगद्विख्यात बिझनेस टायकूननी घेतलेले घटस्फोटही मागील काळात चर्चेत राहिले. तथापि, या सर्वांच्या काडीमोडाच्या कारणापेक्षा मेलोनी यांचे प्रकरण वेगळे दिसत आहे.

जोडीदाराने महिलांविषयक केलेल्या टिप्पणीवरून त्याच्याशी असणारे नातेसंबंध तोडून टाकत त्यांनी एक प्रकारे आपल्यातील बाणेदारपणा दाखवून दिला आहेच; पण स्त्रियांविषयीच्या सन्मानालाही एक उंची प्राप्त करून दिली आहे. वास्तविक, इटलीसारख्या प्रगत युरोपियन देशांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने आपल्या तुलनेत अधिक बोल्ड विधाने सहजगत्या केली जातात. परंतु सरसकट स्त्रियांच्या चारित्र्याविषयी बोलणे किंवा उघडपणाने ग्रुप सेक्सची अट घालणे याचे समर्थन कदापि कुणीही करू शकणार नाही. खुद्द पंतप्रधानांनीच असे समर्थन केल्यास त्यातून चुकीचा संदेश गेला असता. त्यामुळेच मेलोनी यांनी हा धाडसी निर्णय घेतला.

उच्च पदस्थांच्या वैयक्तिक नातेसंबंधांबाबत समाजात फारशी चर्चा होत नाही. परंतु माध्यमांमधून त्यावर भाष्य होत असते. त्या द़ृष्टीने पाहता, मेलोनी आणि त्यांचा जोडीदार यांच्या नात्यात तणाव होता, असेही दिसून आलेले नाही. तरीही त्यांनी हा टोकाचा निर्णय घेऊन एक प्रकारे आदर्शच घालून दिला आहे, असे म्हणावे लागेल. सत्तेचा सुकाणू हाती असणार्‍यांभोवतीचे सगेसोयरे त्याचा गैरवापर करत कशी अधिकारशाही गाजवतात आणि मनमानीपणा करतात, हे आपल्या देशात आपण नेहमीच पाहत असतो. सरपंच, नगरसेवक, आमदार पदांवर असणार्‍या महिलांच्या अनेक पतिराजांची दबंगगिरी समाज निमूटपणाने सहन करत असतो. या पार्श्वभूमीवर विचार करता, मेलोनी यांनी घेतलेल्या निर्णयाचे महत्त्व लक्षात येते. कर्तव्याचा आणि जबाबदारीचा विसर न पडू देण्याचा पायंडा त्यांनी घालून दिला असून, तो अधिक महत्त्वाचा आहे.

Back to top button