Pimpri News: जलपर्णी तयार होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत | पुढारी

Pimpri News: जलपर्णी तयार होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या नद्या वाहतात. या नद्या अतिप्रदूषित झाल्याने पात्रात दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी तयार होते. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना डास व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. जलपर्णीच तयार होऊ नये म्हणून महापालिकेने पावसाळा संपल्यानंतर लगोलग ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.

जलचराचे अस्तित्व आले धोक्यात

पवनानदी शहरातील मध्यभागातून वाहते. तर, इंद्रायणी व मुळा या दोन नद्या शहराच्या सीमेवर आहेत. मावळ व मुळशी तालुक्यासह व इतर भागांतील उद्योग, कारखाने, लघुउद्योग, ग्रामपंचायत, नगरपालिका तसेच, शहरातील भागात तयार होणारे रासायनिक व इतर सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडले जाते. ते सांडपाणी थेट नदीत येऊन मिसळते. त्यामुळे नदी अतिप्रदूषित झाली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण होऊन पात्र अधिक अस्वच्छ झाले आहे. त्यामुळे जलचराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्याबाबत राज्याच्या पर्यावरण विभागाने महापालिकेस अनेकदा नोटिसा बजावल्या असून, बैठकांमध्ये महापालिका अधिकार्‍याना खडसावले आहे.

पालिकेचा दरवर्षी कोट्यवधीचा खर्च

  • नदीपात्र स्वच्छ करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादासह राज्याच्या पर्यावरण विभागाने महापालिकेस अनेकदा दिले आहेत. महापालिकेकडून नदीप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. दरवर्षी जलपर्णी निर्माण होऊन ती स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे.
  • हिवाळ्यात जलपर्णीच्या बिया निर्माण होऊन त्यांना कोंब फुटतात. उन्हाळ्यात त्याची वेगात वाढ होऊन पात्र जलपर्णीने व्यापून जाते. पावसाळा संपल्यानंतर लगोलग महापालिकेने जलपर्णीच्या बिया व कोंब नष्ट करण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत. वरील भागांतून नदीपात्रात येणारी जलपर्णी सीमेवरच अडवून ती नष्ट केली पाहिजे. जलपर्णी वाढूच नये म्हणून महापालिकेने नियोजनबद्ध ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.
  • मात्र, जलपर्णी वाढल्यानंतर महापालिका प्रशासन जागे होते. जलपर्णीमुळे नागरिकांना दुर्गंधीसह डासांच्या प्रादुर्भावास सामोरे जावे लागते. नागरिकांना अनेक आजार होतात. महापालिकेने जलपर्णी कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस धोरण आखले जावे, असे नदीप्रेमींची जुनी मागणी आहे. दरम्यान, आरोग्य विभागाऐवजी पर्यावरण अभियांत्रिकी विभागामार्फत 1 एप्रिल 2023 पासून जलपर्णी काढण्याचे काम करण्यात येत आहे.

नदीपात्रात जलपर्णी तयार होऊ नये म्हणून महापालिकेने उन्हाळ्यापूर्वीच उपाययोजना करावी. नदीपात्रात जलपर्णीच्या बिया तयार झाल्या झाल्या त्या नष्ट कराव्यात. त्यामुळे वाढ न झाल्याने जलपर्णी फोफावणार नाही. त्याचा त्रास नदीकाठच्या रहिवाशांना होणार नाही. तसेच, जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेकडून होणारा कोट्यवधींचा खर्चात बचत होईल.

– मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते

नदीपात्र स्वच्छ करून ते सुंदर व सुशोभित करण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करीत आहेत. सर्व ड्रेनेज वाहिन्याजवळच्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्रास (एसटीपी) जोडण्यात येत आहेत. थेट नदीत सांडपाणी मिसळणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. जलपर्णी वाढू नये म्हणून नदीप्रदूषण कमी करण्यावर भर देण्यात येत आहे.

– संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, महापालिका

शहरातील नद्या दूषित होऊ नये यासाठी जलपर्णी काढण्याचे काम आरोग्य विभागाऐवजी पर्यावरण विभागास दिले आहे. ड्रेनेजलाइनची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे. जलपर्णी काढण्याच्या सध्याच्या कामात जलपर्णी वाढणार नाही, असे नवी अट आहे. त्या दृष्टीने नेमलेल्या ठेकेदारांना काम करावे लागणार आहे. तसेच, नदीचे पाणी स्वच्छ राहावे, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी नवीन धोरण आखले आहे. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

– शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

हेही वाचा 

Maratha Reservation : जरांगे-पाटलांच्या उपोषणाला माथाडी कामगारांचा पाठिंबा

हिंगोली : सकल मराठा समाजाचे पुरजळ सर्कलमध्ये उपोषण सुरु

Pimpri News : औद्योगिक सांडपाण्याची माहिती उद्योगांकडून मिळेना

Back to top button