Pimpri News : निगडी-स्वारगेट मेट्रो प्रवासास चार वर्षांचा कालावधी | पुढारी

Pimpri News : निगडी-स्वारगेट मेट्रो प्रवासास चार वर्षांचा कालावधी

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी ते निगडी या 4.413 किलोमीटर अंतराच्या मार्गावर मेट्रोचे प्रत्यक्ष काम पुढील वर्षात फेबु्रवारी महिन्यात सुरू होईल. वेळेत काम पूर्ण होऊन प्रवासी वाहतुकीस परवानगी मिळाल्यास निगडी ते स्वारगेट असा प्रवास शहरवासीयांना चार वर्षांनंतर म्हणजे जून 2027 पासून शक्य होईल. आपल्या शहरात मेट्रो होत असल्याने या प्रकल्पात 910 कोटींपैकी सर्वाधिक 259 कोटी 86 लाख रुपये खर्चाचा हिस्सा श्रीमंत समजल्या जाणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिकेने उचलला आहे.

मूळ आराखड्यात निगडीपर्यंतचा मार्ग न दाखविल्याने त्या मार्गाचा पहिल्या टप्प्यात समावेश झाला नाही. केंद्राने त्याबाबत उत्सुकताही दाखविली नाही. शहरात पिंपरी पर्यंतच्या मेट्रो धावू लागल्याने निगडीपर्यंत मेट्रो हवी, अशा मागणीच्या नागरिक व लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळे केंद्राने निगडीपर्यंतच्या मार्गास अखेर सोमवारी (दि. 23) अंतिम मंजुरी दिली.
मार्गास मंजुरी मिळणार, या भरवशावर महामेट्रोने निविदेची पूर्व तयारी करून ठेवली होती.

या महिन्याच्या अखेरीस मार्गिका स्टेशन व इतर कामांची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. निविदेची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करून चौथ्या महिन्यात म्हणजे फेबु्रवारी 2024 ला प्रत्यक्ष काम सुरू होईल. कामाची मुदत 3 वर्षे 3 महिने आहे. अडथळा न येता काम पूर्ण झाल्यास कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीची (सीएमआरएस) मंजुरीसाठी महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर शहरवासीयांना निगडीपासून थेट स्वारगेटपर्यंत तसेच, रामवाडी व वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल.

केंद्राने 20 ऐवजी 10 टक्के म्हणजे निम्माच निधी दिल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने उर्वरित निधी देण्यास सहमती दिली. महापालिका 121 कोटी 97 लाख रूपये म्हणजे सर्वाधिक 18.2 टक्के हिश्श्याची रक्कम देणार आहे; तसेच विविध ठिकाणच्या जागा, बाधित ठिकाणच्या रहिवाशांना स्थलांतरित करणे, महापालिकेचे विविध कर आदी असे एकूण 137 कोटी 88 लाख रुपयांची मदत महापालिका करणार आहे. असे एकूण 259 कोटी 86 लाखांचा आर्थिक सहाय महापालिका करीत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या हिश्शाच्या तुलनेत ही सर्वाधिक रक्कम आहे.

केंद्र शासन 67 कोटी 2 लाख (10 टक्के) आणि राज्य शासन 79 कोटी 8 लाख (11.8 टक्के) असा आर्थिक हिस्सा आहे. तर, 402 कोटी 11 लाखांचे (60 टक्के) कर्ज महामेट्रो काढणार आहे. दरम्यान, खराळवाडीपासून ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाण पुलापर्यंतच्या सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) व बीआरटीएस मार्गावर उन्नत (एलिव्हेटेड) मेट्रो मार्गिका तयार करण्यात आला आहे. त्याप्रमाणे उड्डाण पुलापासून निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंच्या सेवा रस्त्यावर मेट्रो मार्गिका उभारली जाईल. ग्रेडसेपरेटर मार्गावर चौक असल्याने सेवा रस्त्याचा पर्याय महामेट्रोने निवडला आहे.

प्रत्येक स्टेशनला चार प्रवेशद्वार

महापालिकेने आपल्या जागा महामेट्रोस मार्गिकेसाठी आणि स्टेशन तसेच, वाहनतळ उभारण्यासाठी दिल्या आहेत. या मार्गावरील तीन स्टेशनच्या प्रवेशद्वारासाठी पदपथावरील जागा देण्यात आली आहे.
एका स्टेशनला दोन बाजूच्या प्रत्येकी दोन या प्रमाणे एकूण चार प्रवेशद्वार असतील. निगडी येथे बस स्थानकाची जागा देण्यात आली आहे. काही ठिकाणी वाहनतळासाठी जागा दिली आहे.

शहराचा मेट्रो मार्ग असल्याने पालिकेचा हिस्सा अधिक

पिंपरी-चिंचवड शहरातील मिसिंग भाग असलेल्या पिंपरी ते निगडी या मार्गवर मेट्रो होत आहे. त्यामुळे महापालिकेचा आर्थिक तसेच, जागा व इतर बाबतीमध्ये सर्वाधिक हिस्सा आहे. या मार्गावरील सर्व जागा महापालिकेच्या ताब्यात आहेत. काम करण्यास महापालिका महामेट्रोस सर्व प्रकारचे सहकार्य करीत आहे. त्यामुळे काम विनाअडथळा मुदतीमध्ये पूर्ण होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांना निगडी, आकुर्डी, चिंचवड व शहरातील इतर भागांतून प्रवास करणे तसेच, पुणे शहरात ये-जा करणे सुलभ होणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

वाहतूक कोंडीची समस्या भेडसावणार

सेवा रस्त्यावरून मेट्रोची मार्गिका तयार केली जाणार आहे. हे काम साडेतीन वर्षे चालणार आहे. निगडी ते मोरवाडी चौकापर्यंतचा सेवा रस्ता अरुंद आहे. विशेषत: निगडी भक्ती-शक्ती चौक, टिळक चौक, बजाज ऑटो कंपनी, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन या ठिकाणी नेहमीच रहदारीचा खोळंबा होता. मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीत मोठीच भर पडणार आहे. त्यामुळे ग्रेडसेपरेटर मार्गावर ताण वाढणार आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी महामेट्रो, महापालिका व वाहतूक पोलिसांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावे लागतील.

चिंचवड, निगडी स्टेशनला मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब

मेट्रोचे चिंचवड स्टेशन पिंपरी पोलिस ठाणे येथे होणार आहे. तेथून चिंचवड रेल्वे स्थानकजवळ आहे. मेट्रो, रेल्वे व बीआरटी मार्ग येथे जोडला जाणार आहे. तसेच, निगडी भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक येथे बीआरटीचे स्थानक आहे. बीआरटी स्थानकाला मेट्रो स्टेशन जोडले जाणार आहे. तेथून किवळे बीआरटी मार्गावर तसेच, तळेगावच्या दिशेने बस आहेत. त्या ठिकाणी मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब तयार केले जाणार आहे.

भक्ती-शक्ती चौकात पुलाचे जाळे

भक्ती-शक्ती चौकात रोटरी पूल, उड्डाण पूल व ग्रेडसेपरेटर आहे. त्यामुळे या चौकात पुलांची व जोडरस्त्यांची संख्या मोठी आहे. मेट्रोच्या मार्गिकेमुळे आणखी एका पुलाची येथे भर पडणार आहे. त्यामुळे नाशिक फाटा चौकाप्रमाणे या चौकात पुलाचे जाळे दिसेल.

मेट्रो कामाच्या प्रगतीचा अंदाजित कालावधी

  • निविदा प्रकिया संपणार – जानेवारी 2024
  • काम सुरू होणार – फेब्रुवारी 2024
  • काम पूर्ण होणार – एप्रिल 2027
  • प्रवासी वाहतुकीस परवानगी – मे 2027
  • नागरिकांसाठी खुला होणार – जून 2027

हेही वाचा

Pune crime news : जवानाने पोलिसाच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक; पुण्यातील घटना, काय आहे प्रकरण! घ्या जाणून?

Pune News : चाळिशीत प्रीती मस्के यांनी जिंकला ‘आयर्नमॅन’

Pune News : ’एटीएमएस’ शहरातील उपरस्त्यांच्या मुळावर

Back to top button