Pune News : ससूनमधील मुक्कामात कैद्यांमध्ये ’सेटलमेंट’ | पुढारी

Pune News : ससूनमधील मुक्कामात कैद्यांमध्ये ’सेटलमेंट’

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ससून रुग्णालयात वॉर्ड क्रमांक 16 मध्ये ड्रग प्रकरणातील आरोपी ललित पाटील आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी विनय अर्‍हाना एकत्र राहत होते. ससूनमधील मुक्कामादरम्यान त्यांच्यामध्ये ‘सेटलमेंट’ झाल्याचे समोर आले आहे. ललित पाटीलला पळून जाण्यात विनय अर्‍हानाने मदत केल्याचे पोलिस चौकशीतून समोर आले आहे. ससून रुग्णालयात वॉर्ड क्रमांक 16 मध्ये पाच मोठ्या खोल्या असून एका खोलीत दोन किंवा तीन कैदी रुग्णांना एकत्र ठेवले जाते.

संबंधित बातम्या :

कैदी नावाला रुग्णालयात राहत असले तरी त्यांचे मध्यस्थांमार्फत बरेच नियोजन सुरु असते आणि बाहेरील सूत्रेही ते येथे बसूनच हलवत असतात. ललित पाटील ससूनमधून ड्रग रॅकेट चालवत होता. त्याची अधूनमधून बाहेरही ये-जा सुरु असायची. ड्रग प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने ससूनमधून पळून जाण्याचे नियोजन केले. यामध्ये त्याच्याबरोबर वॉर्डमध्ये राहत असलेल्या विनय अर्‍हानाचाही सहभाग असल्याने पोलिस चौकशीतून समोर आले आहे. ललित पाटील प्रकरण समोर आल्यानंतर अनेक ‘हाय प्रोफाईल’ कैदी अनेक महिन्यांपासून ससूनमध्ये तळ ठोकून असल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’ने सर्वप्रथम प्रसिध्द केले होते. त्यावेळी विनय अ-हाना 13 सप्टेंबरपासून वॉर्ड क्रमांक 16 मध्ये अ‍ॅडमिट असल्याची बाब समोर आली होती.
ललित पाटील 2 ऑक्टोबर रोजी ससूनमधून पळून गेला. म्हणजेच, पाटील आणि अर्‍हाना 18 दिवस वॉर्डमध्ये एकत्र राहत होते. यादरम्यान, त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली, त्यांनी काय नियोजन केले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’
विविध गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी आजाराचे कारण सांगून ससून रुग्णालयात दाखल होतात. कारागृहाच्या तुलनेत त्यांना रुग्णालयात मोकळीक मिळते. कुटुंबियांशी, बाहेरच्या लोकांशी संपर्कात राहणे सोपे जाते. त्याचवेळी ते वॉर्डमध्ये राहून एकमेकांनाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करत असतात. ’तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशा पध्दतीने त्यांच्यातील ‘सेटलमेंट’ सुरू असते. एकीकडे पोलिस आणि डॉक्टरांना हाताशी धरून नियोजन करत असताना इतर कैद्यांचीही मदत मिळत असल्याने त्यांना नियोजन करण्यास आणखी बळ मिळते. त्यामुळे वॉर्डमध्ये नेमके काय चालते, याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Back to top button