Pune News : समान पाणीपुरवठा योजनेला मिळेना गती | पुढारी

Pune News : समान पाणीपुरवठा योजनेला मिळेना गती

पुणे : पालिकेने हाती घेतलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम वारंवार मुदतवाढ देऊनही कासवगतीनेच सुरू आहे. योजनेंतर्गत बसविण्यात येणार्‍या 3 लाख 18 हजार 847 पाणी मीटरपैकी 1 लाख 39 हजार मीटर आतापर्यंत बसविण्यात आले आहेत. शहरातील नागरिकांना समान व उच्चदाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी आणि सध्या होणारी 40 टक्के पाणीगळती थांबवण्यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. ही योजना पुढील 30 वर्षांची संभाव्य 49 लाख 21 हजार 663 लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आली आहे. या योजनेसाठी अंदाजे 2 हजार 818 कोटी 46 लाख रुपये खर्च येणार आहे.

या योजनेसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, या योजनेच्या प्रवासात सुरुवातीपासूनच कोणत्या ना कोणत्या प्रकारचे विघ्न येत आहे. निविदाप्रक्रिया, मीटर खरेदी, मीटर बसविण्यास होणारा विरोध, पाण्याच्या टाक्या, भूसंपादन, अशा अनेक कारणांनी ही योजना कायमच चर्चेत राहिली आहे. त्यामुळे या योजनेच्या कामाला वारंवार मुदतवाढ देण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. योजनेंतर्गत बसविण्यात येणार्‍या पाणी मीटरला माननीय, स्थानिक नेते आणि नागरिकांचा विरोध होत असल्याने 3 लाख 18 हजार 847 पाणी मीटरपैकी आतापर्यंत 1 लाख 39 हजार मीटर बसविण्यात आले आहेत.

पाणीपुरवठ्याचे नियोजन

पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी 82 पाणी साठवण टाक्या, 1550 किमी लांबीच्या लहान-मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या, 120 किमी लांबीच्या पाणी साठवण टाक्यांना पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्या आणि 3 लाख 18 हजार 847 पाणी मीटर बसवणे, नवीन पाच पंपिंग स्टेशन बांधणे आदी कामे केली जाणार आहेत. योजनेच्या कामाचे विभाजन पर्वती, भामा आसखेड, वारजे, लष्कर, वडगाव, मुख्य वितरण नलिका अशा 6 पॅकेजमध्ये करण्यात येत आहे. हे काम दोन ठेकेदार कंपन्यांना देण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button