गोव्यात पोर्तुगीजांनी पाडलेल्या मंदिरांचे एकच स्मारक उभारा; तज्ज्ञ समितीची शिफारस | पुढारी

गोव्यात पोर्तुगीजांनी पाडलेल्या मंदिरांचे एकच स्मारक उभारा; तज्ज्ञ समितीची शिफारस

पणजी; पुढारी वृत्तसेवा : पोर्तुगीज सत्ता काळामध्ये राज्यातील मोडलेल्या विविध धार्मिक स्थळांची फेरबांधणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने आपला अहवाल सरकारला दिला आहे. पोर्तुगीज सत्ता काळामध्ये मोडलेल्या सर्व मंदिरांचे एकच स्मारक मंदिर उभारा, अशी शिफारस केल्याची माहिती पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

हेही वाचा : 

राज्यातील मोडलेल्या मंदिरांच्या पुनर्उभारणीसाठी सरकारने धोरण जाहीर केले होते. त्याचे जनतेनेही स्वागत केले होते. मंदिरांच्या पुनर्उभारणीसाठी सरकारने पुरातत्त्व खात्यांतर्गत तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती. ही समिती या स्थळांची पाहणी करून त्याचा अहवाल तयार करणार होती. विविध तज्ज्ञांचा समावेश असलेल्या या समितीने आपला अहवाल नुकताच राज्य सरकारच्या पुरातत्त्व खात्याला सादर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री फळदेसाई बोलत होते.

फळदेसाई म्हणाले की, समितीने तयार केलेल्या अहवालानुसार राज्यांमध्ये पोर्तुगीज सत्ताकाळात हजारांपेक्षा जास्त मंदिरे मोडली गेली आहेत. सद्यस्थितीत ही सर्व मंदिरांची पुनर्उभारणी करणे शक्य नाही. त्याबदल्यात त्या सर्व मंदिरांचे मिळून एकच भव्य स्मारक मंदिर उभारले जावे, अशी सूचना तज्ज्ञ समितीने आपल्या अहवालात केली आहे. समितीने प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली आहे. यातील बहुतांश मंदिरांच्या जागी आता कुणाचे तरी घर आहे किंवा कुणीतरी अन्य बांधकाम केलेले आहे. त्यामुळे सदर जागेवर पुन्हा मंदिर बांधणे शक्य नसल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे. दिवाडी जुवे येथील सप्तकोटेश्वराचे मंदिर फेरबांधणी करावी, अशी सूचना समितीने केली आहे. इतर मंदिरांचे मिळून एकच भव्य असे स्मारक मंदिर उभारले जावे. त्यात विविध विभाग स्थापन करावेत. त्यांच्या माध्यमातून पर्यटकांना गोव्याची संस्कृतीची आणि एकूणच धार्मिक स्थळांची माहिती मिळू शकेल, असेही समितीने सूचित केले असल्याचे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.

तिसवाडी, सासष्टी किंवा बार्देशमध्ये व्हावे स्मारक

तिसवाडी, सासष्टी व बार्देश तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मंदिरांचा विध्वंस करण्यात आल्याचे समितीने म्हटले आहे. जे स्मारक मंदिर उभारले जाणार ते याच तीनपैकी एका तालुक्यातच व्हायला हवे, असेही समितीने म्हटले आहे. समितीचा हा अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर ठेवून त्यावर चर्चा केली जाणार असून, त्यानंतर याबाबतची आपली भूमिका सरकार जाहीर करेल, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.

हेही वाचा : 

 

Back to top button