पणजी : लगोरी, गटका खेळांना मिळणार मोठे व्यासपीठ | पुढारी

पणजी : लगोरी, गटका खेळांना मिळणार मोठे व्यासपीठ

सनतकुमार फडते

गोवा; पुढारी वृत्तसेवा :  लगोरी आणि गटका यासारख्या भारतात ग्रामीण भागात गल्लोगल्लीत आणि गावातील जत्रांमध्ये खेळल्या जाणार्‍या पारंपरिक खेळांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आता राष्ट्रीय स्तरावरील मोठे व्यासपीठ मिळणार आहे. गोव्यात होत असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत क्रीडा स्पर्धेचा भाग बनविण्यात आलेले हे खेळ प्रात्यक्षिक क्रीडा प्रकार म्हणून खेळले जाणार आहेत.

प्रतिष्ठेच्या अशा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी देशभरातून विविध राज्यांमधील आणि संघ प्रदेशांतील 7 हजारहून जास्त खेळाडू, क्रीडापटू वा अ‍ॅथलेटस् सहभागी होत असून, नव्या खेळांच्या स्पर्धाही होत आहेत. पारंपरिक खेळांचा समावेश करून या खेळांना उभारी देण्याचा सरकारचा यामागे उद्देश आहे. गेली बरीच दशके पुरेसे प्रोत्साहन न मिळालेला लगोरी अथवा सेव्हन स्टोन हा खेळ खुल्या जागेत खेळला जाणारा असून देशातील खेड्यात राहणार्‍या आणि ग्रामीण भागांतील युवकांमध्ये जास्त लोकप्रिय आहे. उत्तर भारतात हरियाणा आणि उत्तर राजस्थान या भागांमध्ये या भागांमध्ये या खेळाला पिथ्थू असे संबोधले जाते. गुजरातमध्ये साटोलिया, आंध्र प्रदेश येथे पेनकुलाता, तामिळनाडू येथे त्याला एझू कल्लू म्हटले जाते तर केरळमध्ये या खेळाला एरी पंथू असे नाव आहे. दोन संघात होणार्‍या खेळासाठी टेनिस बॉल आणि सात दगडांची गरज असते. हे दगड मनोर्‍याचा स्वरूपात रचले जातात. एका संघाने हा मनोरा पाडून तो पुन्हा उभारायचा असतो. तर प्रतिस्पर्धी संघ बॉल मारून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो.

याशिवाय गटका हा काठ्यांनी खेळायचा प्रकार असून तो पंजाब प्रांतातून देशात पसरला. खेलो इंडिया युथ स्पर्धेचा तो यापूर्वीच भाग बनला आहे. पंजाबमध्ये स्वसंरक्षण युद्धकला म्हणूनही अनेक शतके तो विकसित होत आला आहे.

Back to top button