Momin Kavthekar : ज्येष्ठ साहित्यिक मोमीन कवठेकर यांचे निधन | पुढारी

Momin Kavthekar : ज्येष्ठ साहित्यिक मोमीन कवठेकर यांचे निधन

टाकळी हाजी; पुढारी वृत्तसेवा

कवठे येमाई (ता. शिरूर) येथील ज्येष्ठ साहित्यिक, चित्रपट गीतकार, लेखक आणि कवी बी. के. मोमीन कवठेकर (Momin Kavthekar) यांचे शुक्रवारी (दि. १२) सकाळी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मोमीन यांना लोककलेतील त्यांच्या ५० वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘विठाबाई नारायणगावकर’ हा सर्वोच्च असा ५ लाख रूपयांचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता.

पडद्याआड तर कधी पडद्यापुढे आत्मविश्वासाने वावरलेले ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर (बशीर कमरुद्दीन मोमीन) यांनी आजपर्यंत गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारात विपुल असे लिखाण केले आहे. मोमीन कवठेकरांनी लोककलावंतावर लिहिलेले पुस्तक संदर्भ म्हणून अभ्यासकांकडून वापरले जाते. ते कलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. यामार्फत त्यांनी अनेक लोककलावंतांना शासनाचे मानधन मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी विविध पातळ्यांवर संघर्ष करावा लागला.

त्यांच्या निधनामुळे शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, अरूणाताई घोडे, टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुशेठ घोडे, कवठेचे सरपंच मंगल सांडभोर, निमगाव दूडेचे सरपंच आश्विनी गायकवाड यांनी शोक व्यक्त केला आहे.

कवठेकरांच्या (Momin Kavthekar) लेखणीतून अवतरलेले साहित्य प्रकार

1) पद्य प्रकार : गण, गवळण, लावण्या, भावगीते, भक्तिगीते, भारूडे, सद्यस्थिती वर्णन करणारी लोकगीते, पोवाडे, कविता, बडबडगीते, कलगीतुरा, देशभक्तिपर गीते, मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन, मराठी गाण्यांच्या अल्बमसाठी लेखन तसेच जनजागृती करणारी गीते.

2) गद्य प्रकार : आकाशवाणीवर प्रसारीत लोकनाट्य – हुंडाबंदी, व्यसनबंदी, एड्स, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, साक्षरता अभियान, वगनाट्य- भंगले स्वप्न महाराष्ट्रा, भक्त कबीर, सुशीला मला क्षमा कर, बाईन दावला इंगा, इष्कान घेतला बळी, तांबड फुटल रक्ताचंं.

ऐतिहासिक नाटके- वेडात मराठे वीर दौडले सात, लंका कुणी जाळली, भंगले स्वप्न महाराष्ट्रा.

कविता संग्रह – प्रेमस्वरूप आई.

3) अभिनय : नेताजी पालकर नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका, भ्रमाचा भोपळा नाटकात तृतीयपंथीयाची भुमिका, भंगले स्वप्न महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची भुमिका.

4) प्रकाशित झालेले मराठी अल्बम : रामायण कथा, अष्टविनायक गीते, नवसाची येमाई – भाग एक व भाग दोन, सत्वाची अंबाबाई, वांग्यात गेली गुरं, कऱ्हा नदीच्या तीरावर, येमाईचा दरबार आदी.

7) मिळालेले पुरस्कार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य शासनाचा जिल्हा व्यसनमुक्ती प्रचार कार्य पुरस्कार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पद्मश्री विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार 2012, लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवनगौरव पुरस्कार 2018, सिने अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते छोटु जुवेकर पुरस्कार मुंबई (1980), सिनेअभिनेते निळु फुले यांच्या हस्ते ग्रामवैभव पुरस्कार (1981).

Back to top button