समीर वानखेडे यांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवला | पुढारी

समीर वानखेडे यांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवला

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : जातीच्या प्रमाणपत्रासह पहिल्या पत्नीसोबत झालेल्या विवाहाच्या घटस्फोटाच्या प्रमाणपत्राबाबत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनूसुचित जमाती आयोगाकडे केलेल्या तक्रारीचा तपास पोलिसाकडून सुरु झाला असून त्याचाच एक भाग म्हणून नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची जबानी नोंदविण्यात आली आहे.

बोरिवली विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त रेखा भावरे यांनी हा जबाब नोंदविला आहे. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर मलिक यांनी समीर यांच्या कारवाईवर आक्षेप घेत त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर वैयक्तिक पातळीवर टिका केली होती. ही टिका करताना त्यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले होते.

त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत झालेल्या विवाहाच्या प्रमाणापत्रासह त्यांच्या कुटुंबियांवर बोगस शब्दाचा वापर केला, त्यांची वर्षभरात नोकरी जाणार, समीर हे सतत प्रसिद्धीसाठी माध्यमांचा वापर करुन त्यांच्या पोशाखाबाबत आक्षेपार्ह टिका केली होती. या आरोपानंतर समीर वानखेडे यांनी दिल्लीतील राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाकडे नवाब मलिक यांच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीसोबत त्यांनी त्यांच्या जातीसह विवाह आणि पत्नीसोबत झालेल्या घटस्फोटाच्या काही कागदपत्रे आयोगाकडे सादर केली होती.

आयोगाच्या अध्यक्ष विजय सांपला यांनी ते कागदपत्रे पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडे पाठविले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या बोरिवली विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्ताकडून सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून समीर वानखेडे यांना जबानी नोंदविण्यासाठी बोलाविण्यात आले होते. त्यानंतर ते जबानी देण्यासाठी संबंधित कार्यालयात गेले होते. या जबानीनंतर त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

समीर वानखेडे यांनी दिलेल्या सर्व कागदपत्रांची सध्या पोलिसांकडून शहानिशा सुरु आहे. याच संदर्भात मंगळवारी वानखेडे कुटुंबियांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. त्यांच्या नातेवाईकांनी नवाब मलिक यांच्याविरुद्ध औरंगाबाद येथे तर वानखेडे कुटुंबियांनी वाशिम आणि ओशिवरा पोलिसात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

Back to top button