अखेर न्यूझीलंडच्या जेम्स निशेम याने विजयी जल्लोषात सामिल न होण्याचे सांगितले कारण! | पुढारी

अखेर न्यूझीलंडच्या जेम्स निशेम याने विजयी जल्लोषात सामिल न होण्याचे सांगितले कारण!

अबु धाबी : पुढारी ऑनलाईन

युएईमध्ये सुरु असलेल्या टी २० वर्ल्डकप सेमी फायनल फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडचा ५ विकेट्सनी पराभव केला. न्यूझीलंडने २०१९ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचे उट्टे या सामन्यात काढले. सामन्याचा हिरो ठरला तो ११ चेंडूत २७ धावांची तुफानी खेळी करणारा जेम्स निशेम.

मात्र जेम्स निशेम शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. ज्यावेळी ७२ धावांची महत्वपूर्ण खेळी करणाऱ्या डॅरेल मिचेलने १९ व्या षटकात विजयी चौकार मारला. त्यावेळी जेम्स निशेम पॅव्हेलियनमध्ये पॅड न काढता बसला होता. मिचेलने विजयी चौकार लगावल्या लगावल्या न्यूझीलंडच्या पॅव्हेलियनमध्ये एकच जल्लोष सुरु झाला. हा जल्लोष मैदानावरील कॅमेऱ्यातही कैद झाला. याच बरोबर या जल्लोषी वातावरणात जेम्स निशेम हा स्तब्ध आणि शांत बसला होता हे देखील त्या कॅमेऱ्यात कैद झाले.

शांत बसलेल्या फोटोवर काय म्हणाला ?

हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला. यावेळी जेम्स निशेम याच्या स्तब्ध बसण्यावर मोठी चर्चा सुरु झाली. ही चर्चा सुरु झाल्यानंतर निशेमनेच ट्विट करुन याबाबतचा खुलासा केला. त्याने क्रिकइन्फोने ट्विट केलेल्या त्याच्या शांत बसलेल्या फोटोवर ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली.

निशेम फक्त दोन वाक्यातच म्हणाला, ‘काम संपलं आहे? मला असं वाटत नाही.’ निशेमच्या या प्रतिक्रियेनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कारण निशेमच्या मते अजून फायनल झालेली नाही. त्यामुळेच अजून आपलं काम पूर्ण झालेलं नाही. फक्त इंग्लंडला सेमी फायनलमध्ये पराभूत करून २०१९ त्या वर्ल्डकप फायनलमधील पराभावाची परतफेड करणे हे न्यूझीलंडचे लक्ष्य नाही. न्यूझीलंड टी २० वर्ल्डकप जिंकण्यासाठी युएईमध्ये दाखल झाला आहे. ज्यावेळी न्यूझीलंड इंग्लंडला नमवून फायनलमध्ये पोहचला त्यावेळी पॅव्हेलियनमध्ये निशेम आणि केन विल्यमसन हे दोघेच जल्लोष करत नव्हते. कर्णधार केन विल्यमसनच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते.

आज ( दि. ११ ) पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात भिडणार आहे. यासामन्यातील विजेता १४ नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडबरोबर फायनल खेळेल. सुपर १२ मध्ये पाकिस्तन एकदाही हरलेला नाही. तर ऑस्ट्रेलियाने देखील दमदार खेळ करत ग्रुप १ मध्ये ८ गुणांसह दुसरे स्थान पटकावले होते.

हेही वाचा : 

Back to top button