कधीच 12 न वाजणारे घड्याळ! | पुढारी

कधीच 12 न वाजणारे घड्याळ!

सोलोथर्न : आपण सर्व जण वेळ पाहण्यासाठी घड्याळाचा वापर करतो. आपल्या सर्वांच्या घड्याळात साहजिकच 1 ते 12 पर्यंतचे आकडे असतात. काही घड्याळात अगदी 24 पर्यंतचे आकडेही येऊ लागले आहेत. पण, जागतिक स्तरावर एक शहर असेही आहे, ज्या शहरातील घड्याळात 12 हा आकडाच नाही. याचाच दुसरा अर्थ असा की, तेथे घड्याळात कधीच 12 वाजत नाहीत!

आता एखाद्या घड्याळात 12 वाजत नसतील तर ते चालते कसे, हा प्रश्न जरूर पडेल. त्याचे कारण देखील रंजक आहे. स्वित्झर्लंडमधील सोलोथर्न शहरातील सर्व घड्याळात 12 हा आकडाच दिसून येत नाही. या शहरातील सर्व लोक फक्त 11 या एकाच आकड्यामागे धावत असल्याचे चित्र असते. या शहरातील चर्च व सार्वजनिक ठिकाणांबरोबरच अगदी घराघरात देखील अशीच घड्याळे आहेत, ज्यात 12 हा आकडा असत नाही. शहरातील टाऊन स्क्वेअर या मोक्याच्या ठिकाणी जे घड्याळ आहे, त्यात देखील एकदाही 12 वाजत नाहीत. कारण, त्या घड्याळाने देखील पूर्ण शहराची परंपरा जोपासली आहे.

शहरातील पर्यटन केंद्रे, संग्रहालय व टॉवरमध्ये देखील घड्याळातील आकडे 11 पर्यंतच आहेत. सेंट उर्सुस या मुख्य चर्चमध्ये देखील 11 क्रमांकाचे महत्व अधोरेखित होते. चर्च तयार करण्यासाठी 11 वर्षे लागली होती. चर्चला 11 दरवाजे व 11 खिडक्याच आहेत. याशिवाय, आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील बहुतांशी लोक आपला वाढदिवस चक्क 11 तारखेलाच साजरे करतात. याशिवाय, कोणी काही भेटवस्तू दिले तर ते ही 11 या आकड्याशीच संबंधित असते.

आता 11 या आकड्यालाच महत्त्व का, ते ही रंजक आहे. सोलोर्थनमधील लोक खूप मेहनत करायचे. पण, त्यात त्यांना अपेक्षित यश मिळत नव्हते. त्याचवेळी एल्फ ही एक अनोखी शक्ती या ठिकाणी आली आणि त्या शक्तीने लोकांना प्रेरणा देण्यास सुरुवात केली. जर्मन भाषेत एल्फचा अर्थ 11 असा होतो आणि त्यानंतर सोलोर्थनमधील लोक आपल्या प्रत्येक कामाला 11 या आकड्याशी जोडून घेऊ लागले. एक वेळ तर अशी आली की, त्यावेळी घड्याळातील 12 हा आकडाच काढून टाकण्यात आला आणि हे पूर्ण शहर अकरामय होऊन गेले.

Back to top button