Rohit pawar News : … तर फोटोसमोर बसून आत्मक्लेश; आ. रोहित पवारांची राजकीय फटकेबाजी | पुढारी

Rohit pawar News : ... तर फोटोसमोर बसून आत्मक्लेश; आ. रोहित पवारांची राजकीय फटकेबाजी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अजित पवारांच्या सभेत यशवंत चव्हाण साहेबांचे फोटो दिसत आहेत. त्याच चव्हाणसाहेबांना शरद पवार यांनी गुरू मानलं. त्यांच्या प्रेरणेने पवारसाहेब राजकारण करतात. आता पवारसाहेबांचा फोटो वापरता येईना म्हणून चव्हाणसाहेबांचा फोटो वापरत आहेत. आता चुकीच्या पद्धतीने काम केलं तर कराडच्या समाधीस्थळी जाऊन आत्मक्लेश करण्याची गरज नाही. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या फोटोसमोर बसून केलं तरी चालेल, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा ? या मुद्द्यावरून नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. शरद पवार हे पक्षात मनमानीपणे वागत होते. पक्षात पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत, असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला. या सुनावणीवर शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवारांवरचे आरोप अशोभनीय

ट्रोल करणं हे त्यांचं काम आहे. आज हे लोक वडिलांनाच घरातून बाहेर काढू लागले आहेत. शरद पवारांनी आजवर अनेकांना मंत्रिपद दिली, अधिकारही दिले. त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप केला नाही. पण आज ते विरोधी गटात स्वार्थासाठी गेले अन् तिथं जाऊन म्हणतात पवारसाहेब आमचं चालू देत नव्हते. शरद पवार हे हुकूमशाही पद्धतीने काम करतात, असं म्हणतात, हे अशोभनीय आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

नवाब मलिक कुणासोबत ?

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक अजित पवार यांना पाठिंबा देणार का, असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फार भाष्य करणं टाळलं. आज कोण कुठं आहे, यापेक्षा लढा कसा उभारायला हवं याकडे आमचं लक्ष आहे. आलेल्या बातम्यांवर भाष्य करणं योग्य नाही, असं रोहित पवार म्हणाले.

भुजबळांना कानपिचक्या

मंत्री छगन भुजबळ आज काहीही बोलतील. पण त्यांनी हे विसरू नये त्यांनाच शरद पवारांनी अनेक मंत्रिपदं दिलेली आहेत, अशा कानपिचक्याही रोहित पवारांनी या वेळी दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना पुन्हा कधीतरी मुख्यमंत्री करू असंच म्हणणार. आताच मुख्यमंत्री करू, आताच न्याय मिळवून देऊ, आताच मृत रुग्णांना मदत करू, असं ते म्हणणार नाहीत. नेहमीच पुन्हा करू असं त्यांचं म्हणणं असतं, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

रोहित पवार यांचा आरोग्यमंत्र्यांवर निशाणा

अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल, पण आरोग्यमंत्री तानाजी सावंत कधीच भिकारी होणार नाहीत. अगदी असंच सध्या सुरू आहे. म्हणून तर स्वतःचा विचार करतायेत, रुग्ण मृतांबाबत मला काहीच विचारू नका, असं आरोग्यमंत्री म्हणत आहेत, अशी टीका रोहित पवारांनी केली.

हेही वाचा 

शाहरुख खानच्या Jawan ने घडवला इतिहास, वर्ल्डवाईड कलेक्शन ११०० कोटी पार

Rankala Lake : रंकाळा तलावाला ‘क्वीन्स नेकलेस’ रोषणाई

केमिकल इंजिनिअर ड्रग तस्कर ‘जर्मन’ निघाला ललितचा नातेवाईकच !

Back to top button