Goregaon fire : मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत | पुढारी

Goregaon fire : मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत

मुंबई – पुढारी वृत्तसेवा : गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत व त्यांच्या कुटुंबियांच्याप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना प्रकट केली आहे. तसेच या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

संबंधित बातम्या –

सहवेदना प्रकट करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त करतो. या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी माहिती घेत आहे. मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत.’

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुंबईतील गोरेगाव येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. जखमी झालेल्यांपैकी ३९ जणांना एचबीटी आणि कपूर रूग्‍णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्‍यान, अग्‍निशमन दल आणि पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले आहेत. ३० पेक्षा अधिक दुचाकी आणि ४ कार जळून खाक झाल्या आहेत. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले-

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेनंतर आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे,”गोरेगाव येथे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल जाणून दुःख झाले. आम्ही बीएमसी आणि मुंबई पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि सर्व मदत केली जात आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना.

Back to top button