डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील शहाड स्टेशनजवळच्या बंदर पाड्यात बुधवारी (दि. ४) संध्याकाळच्या सुमारास विचित्र घटना घडली होती. गप्पा मारत असताना पूर्ववैमानस्यातून आपल्या जवळच्या मित्रावर पिस्तुलातून गोळी झाडून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने शहाड रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. उमेश प्रमोद खानविलकर (30, रा. वडवली गाव) असे या तरुणाचे नाव आहे. गोळीबार करणाऱ्या या तरुणाचा पळून जाण्याचा मनसुबा क्राईम ब्रँचने उधळून लावला. त्याच्याकडून पिस्तूल, काडतुसे असा 21 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी सांगितले.
शहाड-आंबिवली रोडला असलेल्या बंदरपाड्यात राहणारा सुशील मोहंतो हा तरुण आपल्या पाच मित्रांसह बुधवारी सायंकाळच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी गप्पा मारत बसला होता. गप्पा सुरू असताना उमेश याने त्याच्याकडील पिस्तुलातून सुशीलवर रोख धरून गोळी झाडली. सुरूवातीला सुशीलला उमेश गंमत करत असल्याचे वाटले. उमेश गोळी झाडत आहे म्हणून सुशीलने हाताचा पंजा चेहऱ्यावर धरला. उमेशने जवळून सुशीलच्या तोंडाच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी सुशीलच्या हाताच्या पंजातून आरपार होऊन तोंडातून जीभ फाटून घशात जाऊन अडकली. या घटनेनंतर इतर मित्रांनी जखमी सुशीलला उल्हासनगर मध्यवर्ती रूग्णालयात नेले. प्रथमोपचारानंतर तेथून त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेनंतर गोळीबार करणारा उमेश घटनास्थळावरुन पसार झाला होता. खडकपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राहूल मस्के, फौजदार संजय माळी, किशोर पाटील, गुरूनाथ जरग, रमाकांत पाटील, अनुप कामत, प्रशांत वानखेडे, बालाजी शिंदे, बापूराव जाधव, उल्हास खंडारे, विलास कडू, दिपक महाजन, सचिन वानखेडे, विनोद चन्ने, मिथुन राठोड, उमेश जाधव, रविंद्र लांडगे, विजेंद्र नवसारे हे पथक हल्लेखोर उमेश खानविलकर याच्या मागावर होते. हल्लेखोर उमेश हा रेल्वेने बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती कळताच या पथकाने मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सापळा रचून शहाड रेल्वे स्थानकातून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी बनावटीचे पिस्तूल, त्यात एक जिवंत काडतूस, तसेच मोबाईल फोन, पॅनकार्ड असा एकूण 20 हजार 250 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हा गोळीबार पूर्ववैमानस्यातून सुशील मोहंतो याला ठार मारण्याच्या उद्देशाने केला होता. आरोपी उमेश खानविलकर याला खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे वपोनि किशोर शिरसाठ यांनी सांगितले.