Elections in Maharashtra 2023 : राज्यातील निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर | पुढारी

Elections in Maharashtra 2023 : राज्यातील निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी २८ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातील निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत (Elections in Maharashtra 2023)

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी होते; पण आजही त्यावर सुनावणी झाली नाही. दीड वर्षापासून या प्रकरणात केवळ ‘तारीख पे तारीख’ चाललेले आहे. दीड वर्षात एकदाही प्रकरणावर सुनावणी झाली नाही. त्यामुळे राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत संभ्रमही कायम आहे. मुंबई, पुण्यासह २५ महापालिका, २०७ नगरपालिका, जिल्हा परिषदा आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. न्यायालयाने सुनावणीसाठी यापूर्वी २० सप्टेंबर ही तारीख निश्चित केली होती. मात्र, त्या दिवशी कामकाज झाले नाही. नंतर पुढची तारीख देण्यात आली. आता पुन्हा २८ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे. (Elections in Maharashtra 2023)

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. सुनावणीच्या तारखेला न्यायालयाने निवडणुकांचा मार्ग मोकळा केला, तरी एका महिन्यात सर्व तयारी करणे तितकेसे सोपे नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्येच होतील, असे राजकीय वर्तुळातून मानले जाते. पुढील वर्षी देशातील सार्वत्रिक निवडणुकाही त्यामुळे या सर्व निवडणुका एकत्रित होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. (Elections in Maharashtra 2023)

Back to top button