Nashik Municipal Corporation : ऐन दसरा-दिवाळीत महापालिकेमध्ये संप? म्युनिसिपल सेना आयुक्तांना बजावणार नोटीस | पुढारी

Nashik Municipal Corporation : ऐन दसरा-दिवाळीत महापालिकेमध्ये संप? म्युनिसिपल सेना आयुक्तांना बजावणार नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा. सातव्या वेतन आयोगानुसार वेतन फरकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्याची रक्कम, दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक महापालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने संपाचे हत्यार उपसले आहे. संघटनेतर्फे बुधवारी (दि. ४) महापालिका आयुक्तांना नियमानुसार संपाची १४ दिवसांची नोटीस बजावली जाणार असून, या मुदतीत प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या काळात महापालिकेमध्ये संप पुकारला जाणार आहे. संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी ही माहिती दिली आहे. (Nashik Municipal Corporation)

महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी म्युनिसिपल कर्मचारी सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेषत: पाणीपुरवठा, विद्युत, मलनिस्सारण, यांत्रिकी यासारख्या तांत्रिक विभागांच्या अधीक्षक अभियंता पदाचा कार्यभार स्थानिक तांत्रिक अधिकाऱ्यांना न देता उपअभियंता संवर्गातील परसेवेतील, अतांत्रिक अधिकाऱ्यांकडे सोपविण्याच्या आयुक्तांच्या भूमिकेनंतर महापालिकेत उभ्या राहिलेल्या स्थानिक विरुद्ध परसेवा वादानंतर म्युनिसिपल सेनेने प्रशासनाविरोधात दंड थोपटले आहेत. यासंदर्भातील आयुक्तांचे आदेश मागे घेण्यासह विविध प्रलंबित मागण्या संघटनेने सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात आयुक्तांसमोर मांडल्या होत्या. मात्र वेतन फरकाचा केवळ दुसरा हप्ता कर्मचाऱ्यांना अदा केला गेला, तर अन्य मागण्यांबाबत फारसा सकारात्मक प्रतिसाद प्रशासनाकडून मिळालेला नाही. त्यामुळे बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. ३) म्युनिसपल सेनेची बैठक महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील संघटनेच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत प्रलंबित मागण्यांसंदर्भात प्रशासनाला जाग येण्यासाठी संप पुकारण्याचा व त्यासाठी प्रशासनाला नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. (Nashik Municipal Corporation)

अशा आहेत प्रलंबित मागण्या

* सातव्या वेतन आयोग वेतन फरकाचा तिसरा व चौथा हप्ता अदा करावा.

* दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान द्यावे.

* अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा.

* जगन्नाथ कहाणे यांचे बेकायदेशीर निलंबन रद्द करावे.

* तांत्रिक संवर्गात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अतांत्रिक स्वरूपाचे कामकाज देऊ नये.

* कश्यपी प्रकल्पग्रस्तांमधील उर्वरित २५ कर्मचाऱ्यांनाही वेतनश्रेणी लागू करावी.

* सफाई कर्मचाऱ्यांना हेल्मेट, गमबूट, पाटी, फावडे, हातगाडे, झाडू, केरभरणी आदी साहित्य द्यावे.

वेतन फरक हप्त्यासह सानुग्रह अनुदान व इतर प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांना बुधवारी नियमानुसार संपाची नोटीस दिली जाईल. नोटिसीच्या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास संप पुकारला जाईल.

– सुधाकर बडगुजर, अध्यक्ष, म्युनिसिपल सेना.

हेही वाचा :

Back to top button