पुणे; पुढारी वृत्तसेवा : जानेवारी ते डिसेंबर 2023 दरम्यान मुदत संपणार्या आणि नव्याने स्थापित झालेल्या जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर 157 ग्रामपंचायींच्या पोटनिवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. 16 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. उमेदावारांची अंतिम यादी निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी दहाच दिवस मिळणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीची 6 ऑक्टोबर रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. 16 ते 20 ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 23 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार असून, 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी निवडणूक लढविणार्या उदेवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे.
सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लढवीत असलेल्या सदस्य आणि सरपंचपदासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. निधन, राजीनामा, अन्य कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंचाची पदे रिक्त झाली आहेत, त्या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, या पदांसाठी पारंपरिक पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. ज्या गावांची निवडणूक जाहीर झाली आहे, त्या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. सार्वत्रिक आणि पोटनिवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींमधील आरक्षित जागेवर निवडणूक लढविणार्या उमेदवाराला अर्जसोबत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पावती जोडावी.
आंबेगाव 30 (14), बारामती 32, भोर 27 (19), दौंड 11 (5), हवेली 4 (10), इंदापूर 6 (8), जुन्नर 26 (15), खेड 25 (21), मावळ 20 (11), मुळशी 23 (14), पुरंदर 15 (7), शिरूर 8 (8) आणि वेल्हे 6 (25) अशा एकूण 231 (157) ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
हेही वाचा