जिल्ह्याचा निधी पळवून तालुक्याचा विकास काय कामाचा?; आ. पडळकर यांची टीका | पुढारी

जिल्ह्याचा निधी पळवून तालुक्याचा विकास काय कामाचा?; आ. पडळकर यांची टीका

जत : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचा निधी पळवून एका तालुक्याचा विकास करणार याला समतोल म्हणतात का? या पळवा पळवीचा गेल्या दोन वर्षात बंदोबस्त केला आहे. यापूर्वी काहींनी जलसंपदा मंत्री म्हणून खाते सांभाळलं व तालुक्यात पाणी आणलं म्हणून डिजिटल बॅनर लावले. इकडे पाणी, तिकडे पाणी, ओढ्यात पाणी सोडले परंतु, कुठेच पाणी आलं नाही, अन् ही मंत्रीपदही गेल. मात्र, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत तालुक्याच्या विस्तारीत योजनेसाठी एकाच वेळेस ९५० कोटी इतका निधी दिला आहे. तालुक्याचा बॅकलॉग भरून काढण्याची जबाबदारी खा. पाटील व माझ्यावर असल्याची स्पष्टोक्ती आ. गोपीचंद पडळकर यांनी दिली. दरम्यान माजी जलसंपदा मंत्री आ. जयंत पाटील यांचे नाव न घेता निधीच्या कारणावरून टीका करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

संबधित बातम्या 

जत येथील गांधी चौक व वाचनालय चौक या ठिकाणी आमदार पडळकर यांनी शहरासाठी व तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. संजय काका पाटील, डॉ. रवींद्र आरळी, तम्मनगोंडा रवीपाटील, संजय तेली, प्रभाकर जाधव, टीमू एडके, महादेव हिंगमिरे, लक्ष्मण जखगोंड, अनिल पाटील, ॲड. नानासाहेब गडदे, ॲड. सागर व्हनमाने, महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा तेजस्विनी व्हनमाने, सरपंच वसुधा हिंगमिरे, सरपंच संगीता लेंगरे, दिपाली देवकते आदी उपस्थित होते.

आ. पडळकर म्हणाले की, राजकारणात स्पर्धा जीवघेण्या आहेत. परंतु, राजकारणात विकासाची स्पर्धा लागली पाहिजे. मी व खा. संजय काका विश्वासाने सांगेन विकासाची स्पर्धा बॅकलॉग भरून काढत आहे. दरम्यान विकासकामाच्या कोणी आडवा आला तर त्याची गय केली जाणार नाही. मागे काय घडलं हे आम्हाला देणंघेणं नाही परंतु, पुढे काय घडवायचे हे आमच्या व तुमच्या हातात आहे. जसे तुम्हाला वाटते तसेच घडेल. खा. संजय काकांची लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. मी लोकसभेला इच्छुक नाही. परंतु, काका मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही फक्त तिकीट घेऊन या. आम्ही तुमच्यासाठी जीवाचं रान करू आणि विजयाची हॅट्रिक साधू. तुम्हाला माहित आहे २०१४ ची निवडणूक ही तुम्ही जवळून पाहिली आहे. मी आत एक बाहेर एक असा करणारा कार्यकर्ता नाही नेहमीच पार्टीबरोबर राहणारा कार्यकर्ता आहे. असेही ते म्हणाले.

खासदार पाटील म्हणाले की, आज सकाळीच आटपाडी राजेंद्र अण्णा देशमुख यांनी सांगितले आहे की, येणाऱ्या विधानसभेसाठी आ. गोपीचंद पडळकर यांना संधी दिली जावी. त्याचबरोबर आ. पडळकर यांना जत तालुक्यातून मोठी मागणी आहे. निश्चितच पडळकर यांचे काम चांगले आहे. त्यांच्यासोबत आम्ही कायम राहू. मी जाहीरपणे सांगितले आहे. आ. पडळकर यांच्यामुळे माझी ताकद दुपटीने वाढलेली आहे. गत वेळी विशाल पाटील यांना मिळालेल्या मतापेक्षा अजून त्यांची मते कमी होणार आहेत. नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासासाठी निधी खेचून आणला आहे. जत तालुक्यातील विकास मी व पडळकर विकास साधण्याचं काम करत आहोत.

हेही वाचा : 

Back to top button