कोल्हापूर : ४०० रूपयांच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानीचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन

कोल्हापूर : ४०० रूपयांच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानीचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन
Published on
Updated on

सरूड; पुढारी वृत्तसेवा : गेल्या गळीत हंगामात तुटलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रूपये शेतकऱ्यांना तातडीने द्या, अन्यथा स्वाभिमानीच्या उग्र आंदोलनाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अथणी शुगर बांबवडे (ता. शाहूवाडी), विश्वास साखर चिखली (ता. शिराळा), दालमिया शुगर चरण-आरळा (ता. शिराळा) या कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर ढोल बजावो आंदोलन करून ऊसदराचा जागर करण्यात आला. महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने शाहूवाडी, पन्हाळा, शिराळा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी सर्व कारखाना प्रशासनांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. गेल्या वर्षभरात उत्पादित साखरेसह उपपदार्थांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळाला आहे. यामधून साखर कारखान्यांना वाढीव नफा मिळाला आहे. या नफ्यावर शेतकऱ्यांचा हक्क आहे. याउलट महागाईमुळे शेतीच्या वापरातील औषधे, खते, बी-बियाणे, किटकनाशके या निविष्ठांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. शेतकऱ्यांना शेती उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसविणे अवघड झाले आहे. यातच दसरा आणि दिवाळीसारखे सण तोंडावर आल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऐन सणासुदीत पैशाची चणचण भासत आहे. यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने साखर आयुक्तांची भेट घेऊन २ ऑक्टोबर पूर्वी साखर कारखान्यांनी गतवर्षी तुटलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची मागणी केली होती.

परंतू अद्यापही सदरचा हप्ता जमा न केल्याने सर्वच कारखान्यांच्या परिसरात गांधी जयंती दिनी ढोल बाजाओ आंदोलनाद्वारे ऊसदराचा जागर करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची मागणी मान्य करा अन्यथा उद्यापासून कारखान्याची साखर वाहतूक रोखून उग्र आंदोलन करण्यात येईल. दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांच्या हक्काचे प्रतिटन ४०० रूपये न दिल्यास कारखानदारांचीही दिवाळी गोड होणार नाही. असा गर्भित इशाराही स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी आंदोलनात वसंत पाटील, सुरेश म्हाऊटकर, राम चेचर, भैय्या थोरात, मानसिंग पाटील, राम पाटील, अमर पाटील (सरुडकर), शरद पाटील, रायसिंग पाटील, पद्मसिंह पाटील, अवधूत जानकर, प्रकाश पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news