पुढारी ऑनलाईन डेस्क : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. मी हॉस्पिटलला भेट देईन आणि डॉक्टरांची एक समिती स्थापन केली जाईल," असेही मंत्री मुश्रीफ यांनी मुंबई येथे आज (दि.०३) माध्यमांशी बोलताना सांगितले.
संबंधित बातम्या :
"खासगी रुग्णालयातील बील भरता येत नसल्याने रुग्ण दुरून या रुग्णालयात येतात. औषध किंवा डॉक्टरांची कमतरता नाही, असे मला सांगण्यात आले आहे. परंतु तरीही, अशी घटना घडली आहे. आज या हॉस्पिटलला भेट देणार आहे. मी या घटनेचा आढावा घेईन आणि यामागील कारणांचा शोध घेतला जाणार आहे. तसेच घटनेच्या चौकशीसाठी आम्ही एक समिती स्थापन करणार आहे," असे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र मंत्रिमंडळात आज नांदेडमधील रूग्णालयातील मृत्यूंबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती मिळत आहे.
मंत्री हसन मुश्रीफ हे आज (दि.३) नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मुंबई येथून विमानाने दुपारी ३ वाजता ते नांदेड विमानतळ येथे पोहचणार आहेत. तेथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट देणार आहेत. दुपारी ३.४५ ते ४.१५ वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दुर्घटना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी ४.१५ वाजता तेथेच पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता खासगी विमानाने नांदेड येथून मुंबईकडे निघणारआहेत.
हेही वाचा :