Pune News : तुम्ही पोलिसांचा नावलौकिक वाढवला! पोलिस आयुक्तांकडून कौतुक | पुढारी

Pune News : तुम्ही पोलिसांचा नावलौकिक वाढवला! पोलिस आयुक्तांकडून कौतुक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘विसर्जन मिरवणुकीत तुम्ही मागील 32 तासांपासून रस्त्यावर उभे असून, दिवसरात्र जागून चांगली कामगिरी केली. भाविकांना कोणतीही अडचण आली नाही. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. पोलिसांचा बंदोबस्त कधी संपत नसतो. पुण्यातील गणेशोत्सवाचा वर्षभरातील सर्वात मोठा बंदोबस्त असतो. आपण चांगला बंदोबस्त करून पुणे पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांचा नावलौकिक वाढवला. त्यामुळे मी आपले अभिनंदन करतो, असे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले.

बंदोबस्त संपल्यानंतर टिळक चौकात बंदोबस्तावरील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना त्यांनी संबोधित केले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, सुहेल शर्मा, रोहिदास पवार, विक्रांत देशमुख, स्मार्तना पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिक येतात. विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा, परिमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांनी बंदोबस्ताची आखणी केली होती.

शहरात विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. कोठेही अनुचित घटना घडली नाही. मानाच्या मंडळांच्या गणेश विसर्जनासाठी नऊ तास लागले. विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या. पोेलिसांनी विसर्जन मार्गावरील ध्वनी मर्यादेची नोंद ठेवली. त्याचे विश्लेषण करून कारवाई करण्यात येणार आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

– रितेश कुमार,
पोलिस आयुक्त, पुणे

हेही वाचा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पिकअपने घेतला पेट..!

पिंपरी : विसर्जनासाठी गेलेला तरुण बुडाला

Pimpri Metro News : महामेट्रोला पावले गणपती बाप्पा; 4 लाखाहून अधिक जणांनी केला प्रवास

Back to top button