चैतन्यदायी गणेशोत्सवास प्रारंभ | पुढारी

चैतन्यदायी गणेशोत्सवास प्रारंभ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘मोरयाऽऽ’चा गजर, ढोल-ताशा, बेंजो पथकांच्या दणदणाटात घरोघरी बाप्पांचे मंगळवारी जल्लोषी आगमन झाले. चैतन्यदायी वातावरणात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी घरगुती गणरायाचा आगमन सोहळा रंगला; तर दुपारनंतर साऊंड सिस्टीम, लाईट इफेक्टस्च्या झगमगाटात सार्वजनिक मंडळांच्या गणेश आगमनाच्या मिरवणुका निघाल्या. दरम्यान, सायंकाळनंतर आलेल्या पावसाने सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ उडाली.

मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाची सर तर दुपारी उन्हाचे चटकेही अनुभवायला मिळाले. दुपारपर्यंत घरगुती गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी गंगावेश, शाहूपुरी, बापट कॅम्प परिसरात गणेशभक्तांची गर्दी होती. सायंकाळनंतर सार्वजनिक गणेश मंडळे, तालीम संस्थांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. सहा वाजल्यापासून वरुणराजानेही हजेरी लावल्याने काही काळ मिरवणुकांमध्ये खंड पडला.

यंदा गणेशमूर्ती आगमनाच्या मिरवणुका 3 सप्टेंबरपासूनच पाहायला मिळत आहेत. शहरातील बहुतांशी 21 फुटी गणेशमूर्तींचेही यापूर्वीच आगमन झाले आहे. मंगळवारी सकाळी आसपासच्या ग्रामीण भागातील गणेशमूर्ती टेम्पो, ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रकमधून रवाना होत होत्या. सायंकाळनंतर राजारामपुरी, क्रशर चौक, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शनिवार पेठ, रविवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी यासह जुन्या पेठांतील मूर्तींचे आगमन सुरू होते. मोरेवाडी, कळंबा, लक्षतीर्थ, जरगनगर, पाचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, टेंबलाईवाडी, गांधीनगर, आर. के. नगर, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, कदमवाडी, भोसलेवाडी परिसरातील बहुतांशी तालीम संस्था व तरुण मंडळाच्या गणेशमूर्तींचे आगमन सायंकाळी झाले. साऊंड सिस्टीम व लेझर शोमुळे रात्री वातावरण उजळून निघाले.

पारंपरिक वाद्यांना मोठी पसंती

बेंजो, लेझीम पथके, ढोल-ताशा पथके अशा पारंपरिक वाद्यांनाही यंदा अनेक मंडळांनी प्राधान्य दिले. काही मंडळांनी यंदाच्या आगमन मिरवणुकीत लेझीमसह हिरिरीने सहभाग नोंदवला.

बॅरिकेडिंग, एकेरी मार्ग

शाहूपुरी, गंगावेश, बापट कॅम्प येथील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता. तसेच यंदा कुंभार गल्ल्यांमध्ये वाहनांना प्रवेश बंद करण्यात आल्याने गणेशभक्तांना पायी जाणे सोईचे ठरले. पाकिंगसाठीही चोख व्यवस्था करण्यात आली होती.

जिल्ह्यातील सुमारे साडेसात हजार सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रतिष्ठापना केली; तर साडेतीन लाख घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Back to top button