Asia Cup Final: टीम इंडियासाठी फायनलचा मार्ग खडतर! जाणून घ्या समीकरण | पुढारी

Asia Cup Final: टीम इंडियासाठी फायनलचा मार्ग खडतर! जाणून घ्या समीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup Final : आशिया चषक सुपर-4 फेरीतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी (10 सप्टेंबर) पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. आता हा सामना आज (11 सप्टेंबर) राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. मात्र, हा सामना राखीव दिवशीही पूर्ण होऊ शकला नाही, तर ग्रुप स्टेजप्रमाणेच दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण दिला जाईल. त्यामुळे टीम इंडियासाठी अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग खडतर होण्याची दाट शक्यता आहे. टीम इंडियाला सुपर-4 मध्ये 12 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आणि 15 सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध सामने खेळायचे आहेत. या दोन सामन्यांचे हवामान कसे असेल ते जाणून घेऊया. कारण या सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय होणे खूप महत्त्वाचे आहे.

भारत-श्रीलंका लढत

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना 12 सप्टेंबर रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ॲक्यूवेदरच्या रिपोर्टनुसार, 12 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये दिवसभरात पावसाची 84 टक्के शक्यता आहे. यासह दाट ढगाळ आकाश अपेक्षित आहे. वादळाची शक्यता 34 टक्के आहे. दिवसा सूर्यप्रकाशाची शक्यता फारच कमी असेल. त्याचवेळी रात्री पावसाची शक्यता 55 टक्के आणि वादळी वाऱ्याची शक्यता 33 टक्के आहे. अशा स्थितीत हा सामना होईल, अशी आशा सध्या तरी दिसत नाही.

Colombo Weather Report

15 सप्टेंबर रोजी हवामान कसे राहील?

भारत आणि बांगलादेश यांच्यात 15 सप्टेंबर रोजी सामना होणार आहे. या सामन्यावरही पावसाचे ढग दाटलेले दिसत आहेत. ॲक्यूवेदरच्या रिपोर्टनुसार, 15 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता 88 टक्क्यांपर्यंत आहे. त्याच वेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. रात्री पावसाची शक्यता 45 टक्क्यांपर्यंत आहे, असेही सांगण्यात आले आहे. (Asia Cup Final)

Colombo Weather Report

अंतिम फेरी गाठण्यासाठी विजय महत्त्वाचा (Asia Cup Final)

सुपर-4 मध्ये टीम इंडियाची पहिली लढत पाकिस्तान विरुद्ध आहे. पण पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास भारत आणि पाकिस्तानला प्रत्येकी एक-एक गुण मिळेल. त्यानंतर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्धचे सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील. त्याचवेळी टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध विजय नोंदवला तर फायनलमध्ये जाण्यासाठी श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकावा लागेल आणि सध्या भारत विरुद्ध श्रीलंका सामना पावसामुळे होताना दिसत नाही. आशिया कप 2023 च्या सुपर-4 फेरीत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे आणि दोन्ही संघांचे प्रत्येकी दोन गुण आहेत. बांगलादेशला सुपर-4 मध्ये लागोपाठ दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याची अंतिम फेरी गाठण्याची शक्यता फारच कमी आहे.

Back to top button