अहमदनगर : जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत | पुढारी

अहमदनगर : जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नगर-मनमाड रस्त्यावरील बाभूळगाव येथे फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. नवीन मुख्य जलवाहिनी फुटल्याने मुळा धरणातून होणारा पाणीउपसा बंद झाल्याने वितरण टाक्या भरणे शक्य नाही. त्यामुळे दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
अहमदनगर शहरास पाणीपुरवठा करणारी नवीन मुख्य 1100 (एम. एम. झेड) जलवाहिनी शुक्रवारी (दि. 1) बाभूळगावजवळ पाटोळे वस्ती येथे हवेच्या दाबाने फुटली. जलवाहिनी फुटल्याने मुळानगर येथून होणारा पाणीउपसा बंद करण्यात आला आहे.

दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. परंतु, ते विस्तृत स्वरूपाचे असल्याने त्यास वेळ लागणार आहे. दरम्यान, या काळात जलवाहिनीद्वारे मुळानगर, विळद, येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार नाही.

परिणामी जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने पाणी उपसा पूर्ववत होईपर्यंत म्हणजेच शनिवारी (दि. 2) व रविवारी (दि. 3) दोन दिवस रोटेशननुसार पाणीवाटपाच्या शहराच्या सर्व मध्यवर्ती भागासह सर्व उपनगरीय भागास उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. शनिवारी नियोजित पाणी वाटप असलेल्या सावेडी भुतकरवाडी, बोरूडे मळा, बालिकाश्रम रोड या भागाचे पाणीवाटप बंद राहणार असून या भागास रविवारी पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

पाणी गाळून व उकळून घ्या

मुळा धरणात नवीन पाण्याची आवक झाल्याने जलवाहिनीद्वारे गढूळ पाणी येत आहे. टाक्यामध्ये तुरटी व क्लोरिनची मात्रा वाढविण्यात आली आहे. तरीही नागरिकांना गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून व उकळून घ्यावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा

त्र्यंबकेश्वरला फराळाच्या खिचडीने गौतम तलावातील हजारो माशांचा मृत्यू

ठाणे : आधी पत्नीवर गोळ्या झाडून संपवलं, नंतर पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू

ऑगस्ट कोरडाठाक ! महिनाभरात अहमदनगर जिल्ह्यात फक्त 25 टक्के पाऊस

Back to top button