बांगलादेशींच्या तपासासाठी अहमदनगर पोलिस कोलकात्यात | पुढारी

बांगलादेशींच्या तपासासाठी अहमदनगर पोलिस कोलकात्यात

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात घुसखोरी केलेल्या चार बांगलादेशींबाबत तपासासाठी नगर तालुका पोलिसांचे एक पथक कोलकात्ता येथे तीन दिवसांपासून तळ ठोकून आहे. त्यांची कोलकात्यातील कागदपत्रेसुद्धा बनावट असल्याचे तपासात समोर आले आहे.

मो. मोहीउद्दीन नाझीम शेख, शहाबुद्दीन जहांगीर खान, दिलावरखान सिराजउल्ला खान व शहापरान जहांगीर खान (सर्व रा. सध्या खंडाळा) या बांगलादेशी घुसखोरांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. त्यांना नाशिक व नगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) खंडाळा (ता. नगर) येथून अटक केली होती. त्यांनी भारतात दहशतवादी कृत्य केल्याचा संशय असून, त्या दिशेने पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 8 अंमलदारांचे पथक कोलकत्ता येथे तपास करीत आहे.

एकाला मुंबईत अटक

आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट अशी बनावट कागदपत्रे तयार करून देणार्‍या रासल एजाज शेख, सोहेल, माणिक खान, नोमान, अब्दुल कादर (सर्व रा. बांगलादेश), कोबीर मंडल (पश्चिम बंगाल) या संशयितांचा पोलिस तपास करीत आहेत. त्यातील अब्दुल याला मुंबई पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली.

हेही वाचा

अहमदनगर : जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत

त्र्यंबकेश्वरला फराळाच्या खिचडीने गौतम तलावातील हजारो माशांचा मृत्यू

ठाणे : आधी पत्नीवर गोळ्या झाडून संपवलं, नंतर पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू

Back to top button