नाशिकमध्ये गणेशोत्सवासाठी ‘ई’ स्वरुपात ‘एक खिडकी’ योजना | पुढारी

नाशिकमध्ये गणेशोत्सवासाठी 'ई' स्वरुपात 'एक खिडकी' योजना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या लगबगीस सुरुवात झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही त्यासंदर्भात पोलिस आणि महापालिकेकडे मागण्या केल्या आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसांत महापालिका आणि पोलिसांची संयुक्त बैठक झाल्यानंतर गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तालयाने यंदा ‘ई’ स्वरुपात एक खिडकी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या १९ सप्टेंबरला नागरिकांसह व सार्वजनिक मंडळांतर्फे गणरायाची स्थापना होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने नियमावलीसह इतर निर्णयांची तयारी केली आहे. येत्या काही दिवसांत विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्वे जाहीर होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहर पोलिस व महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना परवानगीबाबत प्राथमिक तयारी सुरू केली आहे. पुढील आठ-दहा दिवसांत पोलिस यंत्रणेतर्फे एक खिडकी योजनेंतर्गत याबाबत कार्यवाही सुरू होणार आहे. यामुळे पोलिस ठाणे, सहायक आयुक्त, उपायुक्त आणि आयुक्तालयासह शहर वाहतूक शाखा व इतर शाखांसंबंधीत सर्व विभागांत अर्ज करण्याची गरज राहणार नाही. एक खिडकी योजनेतून ई-स्वरुपात कागदपत्रांची पडताळणी आणि ना-हरकत प्रमाणपत्रे तपासून सशर्त परवानगी देणार आहेत. त्याचवेळी गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भातील नियम आणि ढोल पथकांनाही विशेष सूचना करणार असल्याचे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

Back to top button