नगर : जलजीवन खोदाई कामात निष्काळजीपणा | पुढारी

नगर : जलजीवन खोदाई कामात निष्काळजीपणा

चिचोंडी शिराळ : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी तालुक्यात जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाईपलाईन टाकण्यासाठी जेसीबी मशिनद्वारे खोदाई काम निष्काळजीपणाने केले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन, बीएसएनएलच्या केबल तुटल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. चिचोंडी गावठाण रस्त्याच्या कडेला पाईपलाईनचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने लवकर काम करण्यासाठी अनेक शासकीय पाईपलाईन तोडून टाकल्या आहेत.

त्यात मुख्यत्वे प्रत्येक ग्रामपंचायतींना जोडणारी शासकीय बीएसएनएल इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी शासनाने करून ठेवलेल्या बायोमेट्रिक, तसेच ग्रामपंचायतमधील विविध विकासकामांसाठी वरदान ठरणारी इंटरनेट लाईन अनेक ठिकाणी तुटली आहे. याकडे संबंधित शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांचे लक्ष नाही. ही लाईन भविष्यात चालू करावयाची ठरल्यास लाखो रूपये खर्च शासनाला करावा लागेल. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष गरूड यांनी सांगितले. तसेच, वांबोरी चारी पाईपलाईनही अनेक ठिकाणी तुटली आहे. जलयुक्त शिवार योजनेतील अनेक बंधारे, छोटे-मोठे तलाव या योजनेच्या पाईपलाईनमुळे फोडले गेले आहेत.

अनेक ठिकाणी रस्त्याच्या जवळून साईड पट्टी खोदत पाईप टाकले, तर काही ठिकाणी डांबरी रस्ता जेसीबीने उखडून टाकला आहे. पाईपलाईन रस्ता सोडून दोन ते तीन मीटर अंतरावर करणे आवश्यक असते. मात्र, ठेकेदाराने रस्त्याच्या लगतच खोदकाम केले आहे. वारंवार विजेच्या तारा तुटत असल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. पाण्याच्या पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विकासकामे करताना कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचा आरोप संतोष गरूड यांनी केला आहे.

हेही वाचा :

Narali Bhat Recipe : आज बनवा नारळी भात, महाराष्ट्राच्या परंपरेतील खास पदार्थ

Delhi Firing : दिल्ली गोळीबाराने हादरली; ॲमेझॉनच्या सिनिअर मॅनेजरचा मृत्यू

Back to top button