Mission Admission : चौथ्या विशेष फेरीत 3 हजारांवर प्रवेश | पुढारी

Mission Admission : चौथ्या विशेष फेरीत 3 हजारांवर प्रवेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाच्या चौथ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी शनिवारी (दि. 26) जाहीर करण्यात आली. चौथ्या विशेष फेरीत 3 हजार 4 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, 2 हजार 406 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. प्रवेश प्रक्रियेतील पात्रता गुणांमध्ये आता घट झाली आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या गुरुवारपर्यंत (दि.31) प्रवेश निश्चित करता येईल.

यंदा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत 326 कनिष्ठ महाविद्यालयांत 1 लाख 16 हजार 670 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असून, 1 लाख 1 हजार 803 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. केंद्रीभूत प्रवेशांसाठी 1 लाख 296 जागा, कोट्यांतर्गत प्रवेशांसाठी 16 हजार 374 जागा उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेर्‍या आणि तीन विशेष फेर्‍या झाल्या आहेत, तर शनिवारी चौथ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आल्यानंतर 1 हजारांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशासाठी 42 हजार 60 जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या विशेष फेरीसाठी 3 हजार 600 विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यातील 3 हजार 4 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रवेश प्रक्रियेत नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठीचे पात्रता गुण (कटऑफ) आता कमी झाले आहेत. त्यात कला शाखेसाठी सिम्बायोसिस महाविद्यालयात 405 गुण, वाणिज्य शाखेसाठी स. प. महाविद्यालयात 361 गुण, विज्ञान शाखेसाठी फर्ग्युसन महाविद्यालायत 415 गुण आवश्यक असल्याचे उपसंचालक कार्यालयातून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

हेही वाचा :

पंचगंगेला प्रदूषणाचा विळखा होतोय घट्ट

पुणे : दिवसभर ऊन; सायंकाळी हलक्या सरी

Back to top button