पंचगंगेला प्रदूषणाचा विळखा होतोय घट्ट | पुढारी

पंचगंगेला प्रदूषणाचा विळखा होतोय घट्ट

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पंचगंगेच्या प्रदूषणात दिवसागणीक वाढच होत आहे. विनाप्रक्रिया मिसळणारे सांडपाणी पंचगंगेभोवती प्रदूषणाचा विळखा घट्ट करत आहे. अशात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात निर्माल्य थेट नदीपात्रात फेकले जात आहे. पात्रात निर्माल्यासह कचरा मोठ्या प्रमाणात साचून राहिल्याने पंचगंगेला अक्षरशः गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही ठिकाणी तर हा कचरा सडल्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे. यामुळे आपल्या पंचगंगेला वाचवण्यासाठी आता नागरिकांनीच पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.

दररोज सायंकाळी अनेक नागरिक आजही घरातील निर्माल्य, खराब फुले, फळे नदीपात्रात टाकताना दिसतात. याशिवाय जनावरे, कपडे धुण्यासाठी येणार्‍या लोकांची संख्यादेखील मोठी आहे. अमावस्या आणि पौर्णिमेला नदीपात्रात मोठ्या प्रमाणात नैवेद्य सोडले जातात. काही धार्मिक विधींनंतरदेखील निर्माल्य नदीत टाकले जाते. यामुळे नागरिकांनी टाकलेल्या मूर्ती, नारळ, शिबड्या, बुट्ट्या, पत्रिका, फोटोंचे ढीग नदीपात्रात तरंगत आहेत. याकडे महापालिकेने लक्ष देऊन पंचगंगेचे पात्र स्वच्छ करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.

निर्माल्य कुंड उभारण्याची गरज

नदीला दही-भाताचा नैवेद्य दाखवल्यानंतर सर्व साहित्य नदीपात्रात फेकले जाते. याशिवाय घाटाच्या पायर्‍यांवर पूजेसाठी वापरलेली खाऊची पाने, लिंबू आणि केळीची पाने पूजेनंतर नदीत टाकली जातात. सध्या हे निर्माल्य टाकण्यासाठी केवळ एक कोंडाळा आहे. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने पंचगंगा नदीघाटावर ठिकठिकाणी कायमस्वरूपी निर्माल्य कुंड उभे करणे गरजेचे आहे. निर्माल्य दानासाठी व्यापक मोहीम राबवून निर्माल्य कुंड उभारण्यात यावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

Back to top button