Sanju Samson चा ‘रायडू’ होतोय का? चांगली कामगिरी करूनही विश्वचषकाच्या शर्यतीतून बाहेर | पुढारी

Sanju Samson चा ‘रायडू’ होतोय का? चांगली कामगिरी करूनही विश्वचषकाच्या शर्यतीतून बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे यजमानपद असलेल्या वनडे वर्ल्डकपला (ODI World Cup 2023) सुरुवात होण्यास दीड महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. आशिया चषक (Asia Cup) स्पर्धा ही भारतीय संघाला (Team India) या मेगा स्पर्धेपूर्वी आपली तयारी मजबूत करण्याची शेवटची संधी आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी टीम रोहित सेनेची (Rohit Sharma) नुकतीच घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 17 सदस्यीय संघात केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांचे दीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. यासोबतच नुकतेच टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा युवा फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varma) आणि सतत संधी गमावणाऱ्या सूर्यकुमार यादवचाही (Suryakumar Yadav) संघात समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसनला (Sanju Samson) निवडीने पुन्हा हुलकावणी दिली असून त्याला संघात बॅकअप म्हणून स्थान मिळाले आहे.

बॅकअप यष्टिरक्षक म्हणूनच सॅमसनचे अस्तित्व?

संजू सॅमसन (Sanju Samson) हा गेल्या वर्षभरापासून भारतीय संघासाठी सातत्याने चमकदार कामगिरी करणारा यष्टिरक्षक फलंदाज आहे. पण तरीही त्याला संघात स्थान मिळालेले नाही. आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 17 सदस्यांपैकी केवळ 15 खेळाडू वर्ल्डकपसाठी निवडले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बॅकअप यष्टिरक्षक म्हणून सॅमसनची संघात निवड झाल्याने भारतीय संघ त्याच्याकडे केवळ बॅकअप पर्याय म्हणून पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सॅमसनचे (Sanju Samson) वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल असेच दिसत आहे. काही माजी खेळाडूंनी तर सॅमसन हा अंबाती रायडू बनण्याच्या मार्गावर आहे की काय अशी भीती व्यक्त केली आहे.

सॅमसनची (Sanju Samson) गेल्या एक वर्षापासून उत्कृष्ट कामगिरी

सॅमसनने वनडे फॉरमॅटमध्ये भारतीय संघासाठी केवळ 13 सामने खेळले आहेत, परंतु जेव्हाही त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने चमकदार कामगिरी केली आहे. जुलै 2021 मध्ये पहिला वनडे सामना खेळणाऱ्या सॅमसनने एक वर्षानंतर जुलै 2022 मध्ये दुसरा वनडे सामना खेळला. तेव्हापासून, गेल्या एका वर्षात त्याने 12 वनडे सामने खेळले. ज्यात त्याने 50 पेक्षा जास्त सरासरी आणि 100 च्या स्ट्राइक रेटने जवळपास 350 धावा केल्या. यादरम्यान, त्याच्या बॅटमधून तीन अर्धशतकेही झळकली. यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कठीण परिस्थितीत नाबाद 86 धावांच्या खेळीचा समावेश आहे.

सॅमसन आणखी एक रायडू बनण्याच्या मार्गावर

ऋषभ पंत आणि केएल राहुल यांना दुखापत झाल्यानंतर सॅमसनने (Sanju Samson) गेल्या एक वर्षापासून केवळ फलंदाज म्हणून नव्हे तर यष्टीरक्षक म्हणूनही लक्षवेधी कामगिरी केली आहे. मात्र असे असतानाही संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने डावखुऱ्या फलंदाजीतील फरकासाठी त्याच्या जागी युवा फलंदाज तिलक वर्माचा समावेश केला आहे. जे 2019 च्या विश्वचषक संघात अंबाती रायडूच्या जागी 3-डी खेळाडू पर्याय म्हणून विजय शंकरच्या निवडीकडे निर्देश करते. दोन्ही खेळाडूंना चांगली कामगिरी करूनही सांघिक संयोजनामुळे त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होऊ शकलेला नाही. त्यामुळे योगायोगाने सॅमसन आणि रायुडू या दोघांची कहाणी जवळपास सारखीच दिसते आहे.

Back to top button