ODI World Cup : BCCIचा पाकिस्तानला दणका! वर्ल्डकप सामन्याबाबत केली मोठी घोषणा | पुढारी

ODI World Cup : BCCIचा पाकिस्तानला दणका! वर्ल्डकप सामन्याबाबत केली मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात खेळल्या जाणाऱ्या वनडे वर्ल्डकपची (ODI World Cup 2023) वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. वास्तविक बीसीसीआयने आता आपल्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने केलेल्या वेळापत्रकातील बदलाबाबतची मागणी बोर्डाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता आता या जागतिक स्पर्धेतील सर्व सामने नियोजित वेळेवर होतील.

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (Hyderabad Cricket Association) बीसीसीआयला (BCCI) एक पत्र पाठवून आपली समस्या मांडली होती. या पत्रात असोसिएशनने दोन बॅक टू बॅक सामन्यांमुळे हैदराबादच्या मैदानातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र, त्यावर बीसीसीआयने प्रत्युत्तर देत स्पष्ट केले की, ‘विश्वचषकाच्या (ODI World Cup)वेळापत्रकात कोणताही बदल करणे शक्य नाही.’ अखेर बोर्डाचा हा निर्णय हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (Hyderabad Cricket Association) मान्य केल्याचे समजते आहे.

ताज्या वेळापत्रकानुसार हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर 9 ऑक्टोबरला न्यूझीलंड-नेदरलँड्स (NZ vs NED) आणि दुसऱ्याच दिवशी 10 ऑक्टोबरला पाकिस्तान-श्रीलंका (PAK vs SL) यांच्यात सामना होणार आहे. बॅक टू बॅक या सामन्यांमुळे असोसिएशनने सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र लिहून दोन सामन्यांमध्ये वेळ देण्याची मागणी केली होती. असोसिएशनने म्हटले होते की, ‘हैदराबाद पोलिसांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांसाठी सुरक्षा पुरवण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तरी सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन दोन्ही सामन्यांच्या तारखांमध्ये बदल केला जावा,’ अशी विनंती केली होती.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, ‘वर्ल्डकपसाठी हैदराबादच्या ठिकाणाचा मी प्रभारी आहे, तिथे काही समस्या असल्यास आम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेचे वेळापत्रक बदलणे सोपे नाही. एकटे बीसीसीआय हा निर्णय घेऊ शकत नाही. सामन्यातील जोखीम आणि प्रेक्षक यानुसार पोलिसांचा बंदोबस्त केला जातो,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानचे सलग दोन सामने

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर अगामी वनडे वर्ल्डकपचे (ODI World Cup) तीन सामने खेळवले जाणार आहेत. यातील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात होणार आहे. यानंतर दुसरा सामना 9 ऑक्टोबरला न्यूझीलंड-नेदरलँड्स आणि तिसरा सामना 10 ऑक्टोबरला पाकिस्तान-श्रीलंका यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना यापूर्वी 12 ऑक्टोबरला होणार होता, मात्र भारत-पाकिस्तान सामन्याच्या तारखेतील बदलामुळे तो दोन दिवस आधीच शेड्यूल करण्यात आला. 14 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याक्डे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Back to top button