डॉ. दाभोळकर खुनाच्या तपासाबाबत सरकारची दिरंगाई’ : डॉ. हमीद दाभोळकर | पुढारी

डॉ. दाभोळकर खुनाच्या तपासाबाबत सरकारची दिरंगाई’ : डॉ. हमीद दाभोळकर

पुणे : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या हा व्यापक स्वरूपाचा कट असून, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या तपासाबाबत राज्य सरकारकडून अक्षम्य दिरंगाई निदर्शनास आली आहे, अशी खंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र आणि अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली. दाभोलकरांच्या विचारांचा जागर करण्याचे काम दुप्पट निर्धाराने सुरू असून, गोळ्या झाडून विचार संपत नाहीत हे त्यातून अधोरेखित होत आहे,’ असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जादूटोणाविरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याबद्दल प्रबोधन करण्यासाठी जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. डॉ. दाभोलकर म्हणाले, एका बाजूला डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचे सूत्रधार पकडले गेले नसले तरी संशयित मारेकरी पकडले गेले आहेत आणि त्यांच्यावर न्यायालयात केस सुरू आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. दुसर्‍या बाजूला जोपर्यंत सूत्रधार पकडले जात नाहीत, तोपर्यंत विवेकवादी विचारवंतांना आणि कार्यकर्त्यांना असलेला धोका कायम राहणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनातील सूत्रधार पकडले जावेत, यासाठीची लढाई अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने लढत आहे.

हे जरी एका बाजूला असले तरी दुसर्‍या बाजूला डॉ. दाभोलकरांचे काम थांबवण्यासाठी हा खून करण्यात आला. त्यांचे काम अजिबात थांबलेले नाही. उलट दुप्पट निर्धाराने त्यांचे काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये असलेले हे काम महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले आहे. जवळपास 20 राज्यांमध्ये डॉक्टरांच्या विचारांचा जागर केला जात आहे. अंनिसचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त लोकजागर करत आहेत.

Back to top button