देशाची एकता धोक्यात आणणार्‍यांना रोखा : कन्हैया कुमार | पुढारी

देशाची एकता धोक्यात आणणार्‍यांना रोखा : कन्हैया कुमार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : समाजात जाती-धर्माच्या नावाखाली फूट पाडून देशाची अखंडता व एकता धोक्यात आणण्याचे काम जातीयवादी शक्ती करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येत स्व. राजीव गांधी यांचे आधुनिक भारताचे स्वप्न साकार करूया, असे आवाहन काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी केले. पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पार्टी विकावू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राजीव गांधी जयंतीनिमित्त रविवारी आयोजित सद्भावना दौड व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. दिंडनेर्ली येथील राजीवजी सहकारी सूत गिरणी कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर होते. आमदार पी. एन. पाटील यांनी आयोजन केले होते.

घराणेशाहीचा आरोप करताना सोनिया गांधी, राहुल गांधीच यांना दिसतात. भाजपमधील अमित शहा, जय शहा, मनेका गांधी, वरुण गांधी दिसत नाहीत काय? असा सवाल करून कन्हैया कुमार म्हणाले, संतांची आणि शूरवीरांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीत जातीयवादी विचाराला कधीच साथ मिळालेली नाही. परंतु आता ईडीची भीती दाखवून आमदारांना विकत घेतले जात आहे. या शक्तीला महाराष्ट्रात रोखल्यास देशातून जातीयवादी शक्ती हद्दपार होईल. महाराष्ट्रात 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अजित पवारांनाच जवळ घेऊन बसत आहेत. त्यांना उपमुख्यमंत्रीही केले. आता ईडी अजित पवारांचा पत्ता विसरली काय? ईडी म्हणजे भाजपचे इलेक्शन डिपार्टमेंट आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील म्हणाले, कॅगच्या अहवालात रस्त्याच्या एक किलोमीटर कामात 250 कोटींचा भ—ष्टाचार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कोळसा खाण प्रकरणावर टाहो फोडणारे भाजपचे नेते यावर काही बोलत नाहीत. नऊ वर्षांत महागाई आणि बेकारी वाढली.

बाळासाहेब शिवरकर यांनी, राजीव गांधी यांची जयंती सर्वात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात केवळ कोल्हापुरात साजरी केली जाते, असे सांगितले.

आ. पी. एन. पाटील म्हणाले, देशाला नवी दिशा देण्याचे काम राजीव गांधी यांनी केले आहे. या सरकारने काँग्रेसने उभ्या केलेल्या संस्था विकण्याचा सपाटा लावला आहे. हे थांबविण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आपण असेपर्यंत ही सद्भावना दौड काढण्यात येईल.

यावेळी माजी आ. उल्हास पवार, बाळासाहेब खाडे, राजेखान शहाणेदिवाण यांचीही भाषणे झाली. याप्रसंगी आ. ऋतुराज पाटील, आ. राजुबाबा आवळे, राष्ट्रवादीचे (शरद पवार) जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष राहुल पाटील, श्रीपतरावदादा सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील आदी उपस्थित होते. बाजार समितीचे सभापती भारत पाटील-भुयेकर यांनी आभार मानले.

सद्भावना दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

दसरा चौकातील शहाजी कॉलेज येथून कन्हैया कुमार, आ. पी. एन. पाटील, आ. सतेज पाटील, आ. जयश्री जाधव, आ. ऋतुराज पाटील, उल्हास पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सद्भावना दौड काढण्यात आली. याला मोठा प्रतिसाद मिळाला.

‘जो बढिया हिंदी बोलेगा वो दिल्ली जायेगा…’

पी. एन. पाटील आज प्रथमच हिंदीत अतिशय चांगले बोलले, असे आ. सतेज पाटील म्हणाले. थोडावेळ थांबत, मला काय म्हणायचे ते समजून घ्या, असेही ते म्हणाले. याचा संदर्भ देत कन्हैया कुमार आपल्या भाषणात व्यासपीठाकडे बघत म्हणााले, ‘जो बढिया हिंदी बोलेगा वो दिल्ली जायेगा. आप मे से कोई भी आवो’, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.

Back to top button