पुणे : लॉगिन, पासवर्ड न मिळाल्याने पीएम किसानचे काम ठप्प! | पुढारी

पुणे : लॉगिन, पासवर्ड न मिळाल्याने पीएम किसानचे काम ठप्प!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली असून, हे काम आता कृषी विभागामार्फत केले जाणार आहे. पीएम किसानची सर्व प्रक्रिया ऑनलाइन असून, कृषी विभागाला हे काम सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेला लॉगिन व पासवर्डच अद्याप न मिळाल्याने जिल्ह्यात पीएम किसानचे कामकाज सध्या ठप्प पडले आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. आतापर्यंत हे काम कोणी करायचे हे निश्चित नव्हते. कामांच्या जबाबदार्‍यांवरून कृषी, महसूल व ग्रामविकास खात्यात वाद झाले होते.

या वादाचा फटका शेतकर्‍यांनाच बसत होता. मुळात, या योजनेची अंमलबजावणी आधी महसूल विभागाकडे होती. योजनेची सर्वांत चांगली अंमलबजावणी देशपातळीवर महाराष्ट्रानेच केली होती. केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाचा गौरव केला तेव्हा पारितोषिक घेण्यासाठी महसूलऐवजी कृषी विभागाची वर्णी लागली. यावरून महसूल कर्मचार्‍यांनी योजनेच्या कामावरच बहिष्कार टाकला. शासनाने हा पेच सोडविण्यासाठी आता नवी कार्यपद्धती आणली असून, हे काम कृषी विभागाकडे सोपवले आहे.

पीएम किसान योजनेची सर्व कार्यपद्धती ऑनलाइन आहे. यासाठी शासनाकडून कृषी विभागाला, प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र लॉगिंन आयडी आणि पासवर्ड देणे अपेक्षित आहेत. त्यानंतर संबंधित अधिकारी शेतकर्‍यांचे अर्ज ऑनलाइन भरून घेऊ शकतात किंवा काही दुरुस्ती असेल, तर त्यामध्ये बदल करून शकणार आहेत. परंतु अद्यापही कृषी विभागाला हा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळालेला नाही. त्यामुळे सध्या पीएम किसान योजनेचे काम ठप्प झाले आहे. शेतकरी दररोज तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे घालून दमले आहेत.

आता 6 नाही, 12 हजार रुपये मिळणार

केंद्र शासनाच्या वतीने गरीब व गरजू शेतकर्‍यांना वर्षभर शेतीची कामे करण्यासाठी हातभार लागावा म्हणून दर 2 महिन्यांना 2 हजार रुपये, असे वर्षाला 6 हजार रुपये थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. यामध्ये आता राज्य शासनाने अतिरिक्त 6 हजार देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्षाला 12 हजार रुपये जमा होणार आहेत.

पीएम किसान योजनेचे काम आता तहसीलदारांकडून तालुका कृषी अधिकार्‍यांकडे आले आहे. परंतु, शासनाने यासंदर्भातील लॉगिन आयडी आणि पासवर्ड मात्र आम्हाला दिला नाही. तो मिळाल्यावर शेतकर्‍यांचे नवीन अर्ज भरणे, नाव व अन्य दुरुस्तीची कामे केली जातील.

– नंदकुमार वाणी, तालुका कृषी अधिकारी

हेही वाचा

रेल्वेच्या काही गाड्या रद्द, तर काहींच्या मार्गांत बदल

पुणे : पालिकेतील कर्मचार्‍यांच्या बदल्यांची आवश्यकता : डॉ. नीलम गोर्‍हे

१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा लावावा: पंतप्रधान मोदी

Back to top button