न्हावरे गावच्या सरपंच अलका शेंडगे यांना दिलासा | पुढारी

न्हावरे गावच्या सरपंच अलका शेंडगे यांना दिलासा

न्हावरे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : न्हावरे (ता. शिरूर) गावच्या सरपंच अलका बिरा शेंडगे यांना पदावरून हटविण्याच्या विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशाला ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिल्याने सरपंच अलका शेंडगे यांना दिलासा मिळाला आहे. न्हावरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कविता बिडगर यांनी दुसर्‍या ग्रामपंचायत सदस्याला उपसरपंच पदाची संधी मिळावी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

मात्र, अलका शेंडगे राजकीय द्वेषबुध्दीने संबंधित राजीनामा मंजूर करण्यास टाळाटाळ करून उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यास विलंब करतात वआपल्या कर्तव्यापासून दूर पळतात या कारणास्तव माजी सरपंच कमल कोकडे, ग्रामपंचायत सदस्य रेणुका मारणे, कविता बिडगर, विजया भोंडवे, संध्या कदम, उत्तम कदम, तात्याबा शेंडगे, सुभाष कोकडे, समीर कोरेकर या नऊ सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. या नऊ ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी 18 जुलै 2023 रोजी सरपंच अलका शेंडगे यांना न्हावरे ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदावरून हटविण्यात येत असल्याचा आदेश दिला होता.

या आदेशाच्या विरोधात सरपंच अलका शेंडगे यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दि. 25 जुलै 2023 रोजी अपील दाखल केले होते. 28 जुलै रोजी या प्रकरणाची मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सुनावणी घेण्यात आली होती. सुनावणीदरम्यान अपिलार्थी सरपंच अलका शेंडगे यांनी केलेल्या अपिलाची प्रत उशिरा मिळाली असून, त्यामुळे सविस्तर म्हणणे पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्यात येईल म्हणून या प्रकरणी पुढील तारीख देण्यात यावी, अशी विनंती प्रतिवादी असलेल्या वरील नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी केली होती तसेच अपिलार्थी सरपंच अलका शेंडगे यांनी या प्रकरणी स्थगिती देण्याची विनंती मंत्र्यांच्या न्यायालयाकडे केली होती.

या प्रकरणाचे अवलोकन करून या प्रकरणात कोणताही अपहार किंवा भ—ष्टाचार झाला असल्याचे विभागीय आयुक्त यांच्या आदेशात आढळून आलेले नाही. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेता व दोन्हीही बाजूंचे म्हणणे समजून घेतले असता, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी 18 जुलै 2023 रोजी सरपंच अलका शेंडगे यांना सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदावरून काढून टाकण्याच्या आदेशाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे, असे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा

दिवे परिसरातील रिंगरोडच्या मोजणीला विरोध

शिक्रापूर : अपघातग्रस्त कुटुंबासाठी तब्बल बारा लाखांचा मदतनिधी जमा

पुणे जिल्ह्यात बालकांच्या आरोग्य तपासणीला होणार सुरुवात

Back to top button