पावसाच्या उघडीपीमुळे पुण्यात फळभाज्या स्वस्त | पुढारी

पावसाच्या उघडीपीमुळे पुण्यात फळभाज्या स्वस्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पावसाने उघडीप दिल्यानंतर गुलटेकडी मार्केट यार्ड येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात फळभाज्यांची आवक वाढली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत परराज्यासह जिल्ह्यातून आवक दहा ट्रकने वाढून शंभर ट्रक पर्यंत पोहोचली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने हिरवी मिरची, काकडी, घेवडा, शेवगा व मटारच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. तर, कोबी व फ्लॉवरचे दर वाढल्याचे सांगण्यात आले.

रविवारी (दि. 6) बाजारात 100 ट्रकमधून शेतमालाची आवक झाली. परराज्यांतील गुजरात, तमिळनाडू व कर्नाटक येथून 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटक येथून 2 ते 3 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, इंदौर येथून गाजर 8 ते 9 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 4 टेम्पो, कर्नाटक व गुजरात येथून प्रत्येकी 1 टेम्पो भुईमूग, कर्नाटक येथून मटार 1 टेम्पो मटार, कर्नाटक येथून पावटा 2 ते 3 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 9 ते 10 टेम्पो आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले 700 ते 800 गोणी, गवार व भेंडी प्रत्येकी 6 ते 7 टेम्पो, हिरवी मिरची 2 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो सुमारे साडे पाच ते सहा हजार क्रेट्स, ढोबळी मिरची 9 ते 10 टेम्पो, भुईमूग शेंग 50 ते 60 गोणी, मटार 3 ते 4 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा 70 ते 75 ट्रक, इंदौर व आग्रा भागातून बटाटा 40 ते 45 ट्रकमधून
बाजारात दाखल झाला.

दर्जाअभावी खरेदीदारांची पालेभाज्यांकडे पाठ

पाऊस सुरू झाल्यानंतर जिल्ह्याच्या विविध भागांत पालेभाज्यांच्या लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, त्यानंतर आलेल्या जोरदार पावसाच्या तडाख्यामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. बाजारात दर्जाहीन पालेभाज्या मोठ्या प्रमाणात दाखल होत असून, त्याच्या खरेदीकडे खरेदीदारांनी पाठ फिरविल्याने पालेभाज्यांचे भाव कोसळले आहेत. रविवारी बाजारात कोथिंबिरीची दीड लाख, तर मेथीची एक जुडीची आवक झाली. किरकोळ बाजारात गड्डीचे भाव पाच ते दहा रुपयांवर पोहोचल्याचे दिसून आले.

हेही वाचा

नगर : मुलीला पळवून नेणार्‍याला चोवीस तासांत पकडले

माळेगाव : बागायत पट्ट्यात दुष्काळी स्थिती

पेठ : भावडीचा बंधारा वाहू लागला

Back to top button