पेठ : भावडीचा बंधारा वाहू लागला | पुढारी

पेठ : भावडीचा बंधारा वाहू लागला

पेठ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील थूगाव हद्दीतील बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. वेळ नदीवर या भागात नऊ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. त्यातील पूर्ण भरणारा हा पहिला बंधारा ठरला आहे. या परिसरात बटाटा, वाटाणा, भुईमूग, सोयाबीनची पेरणी शेतकर्‍यांनी केली आहे. मात्र, पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज आहे. वेळ नदी ही छोटी असली तरी या भागातील सहा हजार एकर शेतीला तिचे पाणी मिळत आहे. नदीवरील बंधार्‍यातून पाणी वाहू लागल्याने भावडी, कारेगावपर्यंत तिचा छोटा प्रवाह सुरू झाला आहे. त्यामुळे या परिसरातील विहिरींचे पाणी वाढू लागले आहे. वेळ नदी कुरवंडी येथील श्री वेळेश्वर डोंगरात उगम पावते. या परिसरात म्हणावा असा पाऊस अद्याप झालेला नाही.

थूगाव येथील शेतकरी संदीप फणसे, भावडी येथील विकास सोसायटीचे अध्यक्ष सोपानराव नवले, सुशांत नवले यांनी सांगितले की, यावर्षी वेळ नदी पुरेशा प्रमाणात प्रवाहित झालेली नाही. बटाटा, भुईमूग, वाटाणा, सोयाबीन या पिकांना जास्त पावसाची गरज आहे, अ‍ॅड. वसंतराव एरंडे, विकास एरंडे यांनी सांगितले सलग दोन दिवस मुसळदार पाऊस पडला तरच वेळ नदी व त्यावरील नऊ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्ण भरून सातगाव पठार भागातील शेतकर्‍यांनी घेतलेल्या पिकांना जीवदान मिळेल, असे शरद बँकेचे संचालक संतोष धुमाळ यांनी सांगितले.

Back to top button