माळेगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सध्या पावसाने पाठ फिरवल्याने बारामती तालुक्यातील जिरायती भागाबरोबरच माळेगावच्या बागायती पट्ट्यातदेखील पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या भागातील विहिरींची पातळी खालावली आहे. बागायती पट्ट्यातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. उभी पिके कशी जागवावीत या विवंचनेत शेतकरी आहे. पावसाची आगामी नक्षत्रे कोरडी गेली, तर शेतीची अवस्था अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग निरा डाव्या कालव्याचे आवर्तन केव्हा सुटेल यांची वाट पाहत आहेत.
बारामती तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस न पडल्यामुळे बागायती पट्टा होरपळू लागला आहे. माळेगाव परिसरातील कुरण विभाग, वाघमोडे वस्ती, शेंडगेवस्ती, कोळेकर वस्ती गोफणे वस्ती, खोमणे वस्ती, मदने वस्ती या भागातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. माळेगाव बागायती पट्ट्यातील बहुतांशी शेती विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्याच कोरड्या पडल्याने या भागातील शेती धोक्यात आली आहे.
परिणामी, शेतकर्यांना खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या पाऊस नसल्याने करता आल्या नाहीत. आडसाली उसाच्या लागवडी खोळंबल्या आहेत. जनावरांच्या चार्याची मका, कडवळ पाणी नसल्याने जळू लागली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. निरा डाव्या कालव्यावरील फाटा क्रमांक 22 ला जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनिल वाघमोडे, शेतकरी सुभाष आप्पा तावरे, प्रवीण वाघमोडे, राजेंद्र भोसले आदींनी केली आहे.
हेही वाचा