रेल्वेस्थानक पुनर्विकासाची पायाभरणी ; पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन | पुढारी

रेल्वेस्थानक पुनर्विकासाची पायाभरणी ; पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

नगर : पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अहमदनगर, बेलापूर व कोपरगावसह देशभरातील 508 रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. रेल्वे प्रवासात सर्वसामान्य प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत जिल्ह्यातील अहमदनगर, बेलापूर व कोपरगाव या तीन रेल्वेस्थानकांवर पुनर्विकासाची कामे केली जाणार आहेत.

त्यामुळे या तिन्ही रेल्वेस्थानकांचे रूप बदलणार असून, यासाठी 92 कोटी 82 लाख रुपये खर्चाची विकासकामे होणार आहेत. देशभरातील 508 रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी रविवारी सकाळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. त्यानिमित्त अहमदनगर रेल्वेस्थानकावर स्थानिक कार्यक्रम झाले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग नगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सोलापूर मंडल वरिष्ठ सुरक्षा अधिकारी शिवाजी कदम, नगर रेल्वेस्थानकाचे प्रबंधक एन. पी. तोमर यांच्यासह नागरिक व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमापूर्वी रेल्वे अधिकारी व कर्मचार्‍यांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. विविध स्पर्धांमध्ये बाजी मारणार्‍या विद्यार्थ्यांचा खासदार विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
खासदार विखे पाटील म्हणाले, की रेल्वेचा प्रवासी अत्यंत सामान्य असून, त्यांंना आधुनिक सुविधा मिळत नाहीत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी कालखंड सुरू असून, त्यात भारतीय रेल्वेचा कायापालट करून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासात आणि स्थानकांत सुविधा मिळाव्यात यासाठी देशातील 508 ग्रामीण आणि शहरी रेल्वेस्थानकांच्या विकासाची पायाभरणी पंतप्रधानांनी केली.

शिंदे-पवार वादात पडणार नाही : विखे
कर्जत येथील औद्योगिक वसाहतीबाबत आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. कार्यक्रमानंतर याकडे खासदार विखे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की औद्योगिक वसाहती सुरू करण्यापेक्षा यामध्ये कोणते उद्योग येणार आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बर्‍याच ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. मात्र उद्योग नाहीत. त्यामुळे या दोन आमदारांच्या वादात मी पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button