NCP Jayant Patil | जयंत पाटील जाणार का अजित पवार गटात? जितेंद्र आव्हाडांनी खरं काय ते सांगितलं | पुढारी

NCP Jayant Patil | जयंत पाटील जाणार का अजित पवार गटात? जितेंद्र आव्हाडांनी खरं काय ते सांगितलं

 पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार गटातील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर सुरु आहेत. रविवारी (दि.६) माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले होते की, मी अमित शहा यांना भेटलेलो नाही, माझ्याबद्दल गैरसमज पसरविण्याचे उद्योग सुरू आहेत. मी कुठेही जाणार नाही. शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनीही जयंत पाटील यांच्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आम्ही मागेच सांगितल आहे की, “आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत.” त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही.” वाचा सविस्तर बातमी (NCP Jayant Patil)

NCP Jayant Patil : साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्यासोबतचा ११ सेकंदाचा एक व्हिडिओ शेअर करत एक ट्विटर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आम्ही मागेच सांगितलं आहे की, “आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत.” त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही.”

वाचा आव्हाडांची सविस्तर पोस्ट,

“राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष श्री. जयंतजी पाटील साहेब यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे. जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले, ते मंत्री होणार, त्यांनी गावातून लोक बोलावली, अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत. ही पेरणी कशासाठी केली जातेय, हे आम्हांला बरोबर समजतंय. जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की,” जितेंद्र साहेबांनी ईशारा दिलेला आहे लढायचंय. आणि आता थांबणे नाही.”

मला वाटत नाही की, प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की,”आम्ही लढणार आहोत, आम्ही लढणार आहोत.” आम्ही मागेच सांगितलं आहे की, “आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत.” त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही. तेव्हा कृपया ह्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. आमचं ठरलंय, आम्ही लढणार म्हणजे लढणारच. लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचवणे ही काळाची गरज आहे. आणि ते जर आम्ही केलं नाही तर, पुढची पिढी आम्हांला कधीच माफ करणार नाही. सत्ता येते जाते, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हांला कधीचं क्षमा करणार नाही.

जयंत पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश?

पुणे दौर्‍यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री शहा शनिवारी (दि. ४) रात्री शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी होते. त्याच हॉटेलमध्ये जयंत पाटील यांच्यासह आमदार सुमन पाटील, प्राजक्त तनपुरे यांनी शहा यांची भेट घेतल्याची चर्चा रविवारी सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीतून ही भेट झाली असून या भेटीच्या वेळी अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित असल्याचे सांगण्यात येत होते.

Back to top button