अजित पवार-जयंत पाटील येणार आमने-सामने | पुढारी

अजित पवार-जयंत पाटील येणार आमने-सामने

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी आणि त्यानंतर एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नेतेमंडळी उद्या (शुक्रवार) आमने-सामने येणार आहेत. निमित्त आहे आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा कामकाज सल्लागार समितीची आयोजित केलेली बैठक.

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींमुळे वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीसंदर्भात विधिमंडळ सचिवालयाकडून जारी केलेल्या पत्रामध्ये विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, दादा भुसे, उदय सामंत, राष्ट्रवादीचे विधानसभा सदस्य जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण तसेच निमंत्रित म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, आशिष शेलार व अमिन पटेल यांची नावे आहेत.

विशेष म्हणजे, या बैठकीला ठाकरे गटाच्या कोणत्याही सदस्याला आमंत्रित केलेले नाही. यासंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. नार्वेकर यांना विचारले असता, ते म्हणाले, गेल्यावेळी बैठकीसाठी जी नावे होती त्यांनाच बोलावले आहे. त्यामुळे कोणाची नावे वगळण्याचा प्रश्नच नाही.

Back to top button