तासगाव; पुढारी वृत्तसेवा : आमदार सुमन पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत पुणे येथे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याची अफवा आहे. आबा कुटुंबाची भूमिका अजित पवार यांनी बंड केले त्याचवेळी स्पष्ट केली आहे. आम्ही शेवटपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवा नेते, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य रोहित आर. आर. पाटील यांनी दिली.
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे, शिराळ्याचे आमदार मानसिंग नाईक, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे अजित पवार गटात सहभागी होतील, असे बोलले जात आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौर्याच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार सुमन पाटील यांनी त्यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत रोहित पाटील म्हणाले, आर. आर. आबा यांच्या पाठिशी कोणतीही राजकीय ताकद नसताना मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली. आबांचे राजकारण शरद पवार यांचा पाठिंबा, निष्कलंक चारित्र्य आणि या मतदारसंघातील लोकांचे प्रेम व पाठिंबा यावर मोठे
झाले. आमचीही राजकारणातील वाटचाल तत्वे आणि निष्ठा या पायावर टिकून आहे. आबा कुटुंबाची भूमिका अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हाच स्पष्ट केली आहे. आजही आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत.