पुणे : पीएमपी उभारणार हजार थांब्यांवर शेड | पुढारी

पुणे : पीएमपी उभारणार हजार थांब्यांवर शेड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपी प्रशासनाकडून पुणे व पिंपरी-चिंचवड परिसतील प्रवाशांसाठी आगामी काळात 1 हजार बसथांब्यांवर शेड उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्याकरिता ठेकेदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. एकाच ठेकेदाराला हे काम देणे शक्य होते. मात्र, थांबे बसविण्याचे काम लवकरात लवकर व्हावे आणि प्रवाशांची सोय व्हावी, याकरिता पीएमपीकडून या कामासाठी 10 ठेकेदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
शहरात अनेक ठिकाणी बसथांब्यांवर शेड नसल्याने पुणेकर प्रवाशांचे ऊन, वारा तसेच पावसामुळे प्रचंड हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत पहाणी करून दै. ‘पुढारी’ने ‘पीएमपी प्रवासी पावसात, बस थांब्यांअभावी प्रवाशांचे हाल’ असे वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत पीएमपी अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी शहरातील विविध मार्गांवर प्रवाशांकरिता 1 हजार बसथांब्यांवर शेड उभारण्याचे नियोजन केले आहे. यासंदर्भात सिंह यांनी नुकतीच माहिती दिली.

सिमेंटच्या बांधकामाची मागणी…

बसथांब्यांवर सिमेंट, विटांचे बांधकाम असावे, अशी मागणी पीएमपी अध्यक्ष पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे करणार आहेत. सिमेंटचे पक्के बांधकाम असेल तर प्रवाशांची मोठी सोय होणार असून, त्यांचे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण होणार आहे.

पीएमपीच्या थांब्यांवरील सध्या असलेल्या शेड

स्टेनलेस स्टील – 850
बीआरटी – 124
साधे – 153
एकूण – 1,127
पुणेकर प्रवाशांकरिता बीओटी तत्त्वावर 1 हजार बसथांबे उभारण्याचे नियोजन आमच्याकडून करण्यात आले आहे. येत्या तीन महिन्यांत यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण होईल.  या थांब्यांमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
– सचिंद्र प्रताप सिंह, 
अध्यक्ष व व्यवस्थापकीय 
संचालक, पीएमपी
हेही वाचा

Back to top button