कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गास गती देऊ : खा. धनंजय महाडिक | पुढारी

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गास गती देऊ : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरचे रेल्वे स्टेशन हेरिटेज असून, विविध ठिकाणांना जोडणारा दुवा आहे. कोकण रेल्वेचे भूमिपूजन झाले. गोव्यात यासंदर्भात नुकतीच बैठक झाली. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेस गती मिळेल, यासाठी प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पामुळे कोल्हापूरच्या विकासात भर पडेल, असे प्रतिपादन खा. धनंजय महाडिक यांनी केले.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत राजर्षी शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचा प्रारंभ रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला. रेल्वे स्टेशनवरील झालेल्या कार्यक्रमात खा. महाडिक बोलत होते. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कलगोंडा पाटील, वसंतराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूरसह देशातील 508 व राज्यातील 44 स्थानकांमध्ये एकाचवेळी ऑनलाईन कार्यक्रम झाला.

खा. महाडिक म्हणाले, नियोजनाचा अभाव, अस्वच्छता, असुविधा यामुळे रेल्वेकडे पाहण्याचा यापूर्वी द़ृष्टिकोन वेगळा होता. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे देशातील रेल्वे स्टेशनचे रूप बदलत आहे. 70 वर्षांनंतर देशातील रस्ते, विमानतळ यांचा विकास होत आहे. रेल्वेचा पुनर्विकास करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक विक्रम केला आहे. देशातील 508 रेल्वे स्टेशनच्या विकासकामांचे एकाच वेळी भूमिपूजन केले आहे. यामुळे 2024 ला पुन्हा मोदीच देशाचे पंतप्रधान होतील. दिल्लीत कोल्हापूर रेल्वे स्टेशनसंदर्भातील प्रश्न मांडून 6 कोटींवरून 43 कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. राजर्षी शाहू टर्मिनसच्या वास्तूला धक्का न लावता पुनर्विकास केला जाणार आहे. सह्याद्री, कोयना गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू केले जाणार आहेत.

याप्रसंगी भारतीय रेल्वेच्या विकासाची चित्रफीत दाखविण्यात आली. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त रेल्वे मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, राहुल चिकोडे, भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, स्टेशन अधीक्षक विजयकुमार, बियाणी, वीरेंद्र मंडलिक, भगवान काटे आदी उपस्थित होते.

आगामी काळात कोल्हापूर-मुंबई वंदे भारत रेल्वेसाठी प्रयत्न

देशात सध्या संपूर्ण वातानुकूलित असलेल्या 25 वंदे भारत रेल्वे सुरू आहेत. मिरजचा ट्रॅक जुना असल्याने त्यावरून वेगाने रेल्वे पुढे जाऊ शकत नाही. भविष्यात कोल्हापूर- मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर कोल्हापूर-मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही खा. महाडिक यांनी दिली.

Back to top button