‘चांदोली’त पंधरा दिवसांत १४.२५ टीएमसी पाणीसाठा; ८२४ मिलिमीटर पावसाची नोंद | पुढारी

'चांदोली'त पंधरा दिवसांत १४.२५ टीएमसी पाणीसाठा; ८२४ मिलिमीटर पावसाची नोंद

चंद्रकांत मुदूगडे

सरुड, पुढारी वृत्‍तसेवा : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या १५ दिवसांत ८२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या याच कालावधीच्या (२४५ मिमी) तुलनेत २३६ टक्के अधिक पर्जन्यवृष्टी झाली आहे. यामध्ये २३ जुलै रोजी ९६ मिलिमीटर सर्वाधिक पाऊस पडला आहे. विशेष योगायोग म्हणजे गतवर्षी २३ जुलै २०२२ या दिवशी धरण क्षेत्रात ५७४ मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती. दरम्यान गेल्या पंधरा दिवसात झालेल्या सातत्यपूर्ण, संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात १४.२५ टीएमसी इतकी झपाट्याने वाढ होऊन अल्पावधीतच धरण ८५ टक्के भरले आहे.

सद्या पावसाचा जोर ओसरला असला तरी अद्यापही अधिकच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविली जात असल्याने लवकरच धरण (वसंत सागर) पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. मात्र, दरम्यानच्या काळात जलाशय परिचलन सूचीनुसार धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याबरोबरच संभाव्य पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धरणातून १९ जुलै पासून वीज जनित्र गृहातून ४०० क्यूसेकने सुरू असणाऱ्या पाणी विसर्गात २६ जुलै रोजी वक्र दरवाजे उघडून अडीच ते तीन हजार क्यूसेक पर्यंत वाढ करण्यात आली. त्यामध्ये शुक्रवारपासून पुन्हा सुमारे ६७०० ते ६८०० क्यूसेकने वाढ करण्यात आली. परिणाम स्वरूप २९.३७ टीएमसी (८५.३६ टक्के) वर पोहचलेल्या पाणीसाठ्यात २९.१३ टीएमसी (८४.६७ टक्के) पर्यंत घट झाली आहे, अशी माहिती वारणा प्रकल्पाचे सहायक अभियंता एम. एम. किटवाडकर यांनी दिली.

दरम्यान यंदाच्या पर्जन्य वर्षातील पहिला जूनचा संपूर्ण महिना कोरडा गेला होता. त्यामुळे वारणा (चांदोली) धरणातील उपयुक्त पाणीसाठा ३.९२ टीएमसी (मृत साठा जवळपास ७ टीएमसी) इतका तळाला गेला होता. मात्र जुलै महिन्यातील धुवांधार पावसाने ही कसर भरून काढली. गेल्या २३ दिवसांत ८८९ मिलिमीटर पाऊस बरसला. साहजिकच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून ३ हजार ४७० क्यूसेकने होणारी पाण्याची आवक बघताबघता २० जुलै-२३०९०, २१ जुलै -२२४८५, २३ जुलै-२२२८३, २४ जुलै-२२१०४ क्यूसेक पर्यंत वाढली. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासातील आवक ४ हजार ५९६ क्यूसेकने झाली आहे. तर एकूण ६० दिवसांत १ हजार १७०मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली. गतवर्षीच्या (१३०५ मिमी) तुलनेत १३५ मिलिमीटर पाऊस कमी झाला असल्याचे देखील यावेळी किटवाडकर यांनी सांगितले.

२.६० टीएमसी पाणी सोडले नदीपात्रात !

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विशेषतः जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या पावसाच्या आकडेवारीवर दृष्टिक्षेप टाकल्यास धरण प्रशासनाने धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गेल्या पाच दिवसांत पाणी विसर्गातून जवळपास २.६० टीएमसी इतके पाणी वारणेच्या पत्रात सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ शाहूवाडी तालुक्यातील कडवी लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठवण क्षमते (२.५१ टीएमसी) पेक्षाही अधिक पाणी सोडण्यात आले आहे. यानिमित्ताने धरण प्रशासनाचे कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

.हेही वाचा 

इंद्रधनुष्य अर्धाकृती नव्हे, पूर्णाकृती !

जोगेश्वरीत रिक्षाचालकाच्या गळ्यावर चाकू लावून लुटले

नाशिकवरील पाणीकपातीचे संकट टळले, गंगापूर धरण ‘इतकं’ भरलं…

Back to top button